२०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीआधी दिवाळीत देशाच्या जनतेला बंपर गिफ्ट देण्याची मोदी सरकार तयारी करीत आहे. भाडेकरूंना घर खरेदी करण्यासाठी आवास निधी योजनेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेतकरी सन्मान निधीची रक्कम दुप्पट करणे व केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढविण्यापासून ते बोनस देण्याच्या सर्व घोषणा दिवाळीपूर्वी होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढविण्यापासून शेतकरी सन्मान निधीची रक्कम दुप्पट करण्याचे प्रस्ताव विचाराधीन होते; परंतु, हे सर्व प्रस्ताव दिवाळीनिमित्त भेट देण्यासाठी तूर्त रोखण्यात आले आहेत. आजच्या बैठकीत ३ खनिजांच्या रॉयल्टी दराला मंजरी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढविणार
- शेतकरी सन्मान निधीची रक्कम सहा हजारांपासून वाढवून १२ हजार करण्याची योजना आहे.
- केंद्रीय कर्मचारी व पेन्शनर्ससाठी डीए, बोनस देण्याची घोषणा होणार आहे.
- देशातील १० कोटींपेक्षा जास्त भाडेकरूंसाठी आवास निधी योजना सुरु केली जाणार आहे.
- महिलांसाठीही आकर्षक योजना सुरु करण्यात येणार आहे.
निवडणुकीचा मुहूर्त
- १२ नोव्हेंबर रोजी दिवाळी आहे. १७ नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेश व छत्तीसगढ, २५ नोव्हेंबर रोजी राजस्थान आणि ३० नोव्हेंबर रोजी तेलंगणामध्ये मतदान होणार आहे. निवडणुकीच्या तारखा व दिवाळीच्या तारखा पाहून दिवाळीच्या मुहूर्तावर देशातील जनतेला बंपर गिफ्ट देण्याची तयारी सुरु आहे.
- केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यामध्ये २३ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. सध्याच्या ४२ टक्क्यांवरून तो ४५ टक्के होण्याचा अंदाज आहे. त्याची अंमलबजावणी १ जुलै २०२३ पासून होईल.