नितीन चौधरी
पुणे: पंतप्रधान किसान सन्मान योजनेत राज्यातील ४ हजार १६८ शेतकऱ्यांकडे दोन आधार क्रमांक आढळले असून, या शेतकऱ्यांनी या योजनेतून दोनदा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.
त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे आधार क्रमांक दुरुस्त करून एकच खाते कायम ठेवून दुसरे खाते बंद करण्यासाठी कृषी आयुक्तालयाकडून सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.
यात दुरुस्ती करून दोनदा लाभ घेतलेल्यांकडून संबंधित रकमेची वसुलीही करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे. दुरुस्ती न केल्यास या शेतकऱ्यांना शनिवारी (दि. ५) देण्यात येणारा योजनेचा १८ हप्ता मिळणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत केंद्र सरकारच्या पोर्टलवर राज्यातील ८ हजार ३३६ खात्यांची अर्थात ४ हजार १६८ शेतकऱ्यांकडे दोन आधार असल्याचे केंद्र सरकारच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.
एकच आधार क्रमांक असल्यास त्याला संलग्न बँक खात्यात लाभाची रक्कम थेट जमा केली जाते. मात्र, या खात्यांची आधार दुरुस्ती प्रलंबित असल्याचे दिसून आले आहे.
ही दुरुस्ती करण्याची सुविधा पीएम किसान या पोर्टलवर उपलब्ध नाही. या खात्यांना दुबार आधार असल्याने दुरुस्ती झाल्याशिवाय त्यांना योजनेचा लाभ यापुढे देता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोन्हींपैकी एक खाते होणार कायम बंद
कृषी आयुक्तालयाने यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना या शेतकयांची संख्या कळविली असून, शेतकऱ्याऱ्यांकडून लेखी प्रपत्र मागविली आहेत. त्यात ज्या आधार क्रमांकाचे खाते सुरू ठेवायचे आहे, तसे स्वीकार प्रपत्र व जे खाते बंद करायचे आहे, त्याचे स्वतंत्र प्रपत्र द्यावे लागणार आहे. बंद करण्यात येणाऱ्याा आधार क्रमांकाचे खाते कायमस्वरूपी चंद करण्यात येणार आहे.
योजनेचा १८ वा हप्ता शनिवारी
या खात्यावर योजनेतून पूर्वी लाभ घेतलेल्या सर्व रकमेची वसुली करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे. अशा शेतकऱ्यांना योजनेचा १८ वा हप्ता मिळणार नसल्याचेही यात स्पष्ट करण्यात आले आहे. योजनेचा १८ वा हप्ता शनिवारी (दि. ५) देण्यात येणार आहे.