प्रधानमंत्री किसान सन्मान शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत १७ हप्ते जमा झाले आहेत. मात्र, अद्यापही १८वा हप्ता जमा झालेला नव्हता.
अखेर हा हप्ता जमा करण्याची तारीख निश्चित करण्यात आली असून, दोन हजारांचा १८वा हप्ता ५ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
कृषी विभागाकडून याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. ई केवायसी व आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. मात्र, अद्याप ज्या शेतकऱ्यांनी ई- केवायसी केलेले नाही ते शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे.
महत्वाचे
■ जे शेतकरी आधार सीडिंग करण्यासाठी उपलब्ध झालेले नाहीत, त्यांना 'नॉट रिचेबल' असे म्हणून अपात्र केले तर त्यांच्याकडून इतर हप्ते वसूल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
■ बँकेत जाऊन एनपीसीआय मॅपिंग करून घ्यावे किंवा पोस्ट खात्यामध्ये आयपीपीबीअंतर्गत खाते उघडल्यास आधार सीडिंग होते.
■ ई-केवायसीसाठी फेस ऑथेंटिकेशनचा वापर करावा.
■ प्रलंबित ई-केवायसी व आधार ४ सीडिंगच्या याद्या गाव पातळीवर उपलब्ध.
■ बऱ्याच दिवसांची प्रतीक्षा अखेर संपणार.
■ ई केवायसी नसेल तर मिळणार नाही लाभ.
केंद्र शासनाचा पीएम किसानचा १८वा हप्ता व राज्य शासनाचा नमोचा हप्ता प्राप्त करून घेण्यासाठी वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी आधार सीडिंग, ई- केवायसी पूर्ण करून घ्यावी. त्यासाठी जवळील तालुका कृषी कार्यालयाशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, जेणेकरून कोणी वंचित राहणार नाही.