PM Kisan Yojana Installment : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा केंद्र सरकारचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला असून राज्य सरकारचा हप्ता जमा होण्याचे बाकी होता. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार शेतकऱ्यांना प्रतिवर्ष ६ हजार रूपयांचा निधी टप्प्याटप्प्याने वितरीत करण्यात येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिवर्षी १२ हजार रूपये मिळतात.
दरम्यान, 'नमो शेतकरी महासन्मान निधी'चा चौथा हप्ता शेतकऱ्यांना अजून मिळाला नव्हता. पण राज्य सरकारने हप्ता वाटपासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. चौथ्या हप्त्यासाठी राज्य सरकारने २ हजार ४१ कोटींचा निधी वितरीत करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे पात्र शेतकर्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता येणाऱ्या दोन दिवसांत मिळण्याची शक्यता आहे.
'नमो शेतकरी महासन्मान निधी'च्या अंतर्गत राज्य सरकारने आत्तापर्यंत ५ हजार ५९२ कोटी रूपयांचा निधी वितरीत केला आहे. यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना ६ हजार रूपये खात्यामध्ये वर्ग करण्यात आले आहेत. तर चौथ्या हप्त्यासाठी राज्य सरकारने २ हजार ४१ कोटी २५ लाख निधी आणि प्रशासकीय खर्चासाठी २० कोटी ४१ लाख एवढा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.
कधी मिळणार हप्ता?
राज्य सरकारने या हप्त्याच्या वितरणासाठी मंजुरी दिली असून आता निधी उपलब्ध झाला आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा डाटा राज्य सरकारकडे असल्यामुळे येणाऱ्या दोन दिवसांत हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्याची शक्यता आहे.