Join us

उद्या सकाळी ११ नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसानचा हप्ता

By मुक्ता सरदेशमुख | Published: July 26, 2023 6:57 PM

पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता उद्या सकाळी ११ नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. राजस्थानातील सिकर येथे आयोजित ...

पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता उद्या सकाळी ११ नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. राजस्थानातील सिकर येथे आयोजित संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी या हप्त्याचे वितरण करणार आहेत. 

यामध्ये देशातील ८.५  कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांना १८,००० कोटींपेक्षा अधिक रकमेचे ऑनलाइन वितरण करण्यात येणार आहे. पीएम किसानचा मागील हप्ता २७ फेब्रुवारी रोजी कर्नाटकातून जारी करण्यात आला होता. या योजनेचा १४ वा हप्ता उद्या राजस्थानातून वितरित केला जाणार आहे.

पीएम किसान सन्मानंद निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये दिले जातात. दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते. याचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्चपर्यंत पाठविला जातो.

राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा कार्यक्रम पोहोचण्याचा दृष्टीने प्रत्येक गावामध्ये हा कार्यक्रम ऑनलाइन प्रक्षेपित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व कृषी विद्यापीठे, कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र ,शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी गटांना विविध माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन शासनाने केले आहे.

पीएम किसानच्या १४ व्या हप्ता वितरण  कार्यक्रमात या संकेतस्थळाच्या माध्यमातून सहभागी व्हायचे आहे.https://pmevents.ncog.gov.in

या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा लाभ

  • जर शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले नसेल तर त्यांना पीएम किसानचा लाभ मिळणार नाही. 
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला जमिनीची मालकी असणे आवश्यक आहे. जर एखाद्या शेतकऱ्याने जमीन भाडेतत्त्वावर घेतली असेल तरीही त्याला या योजनेचा लाभ मिळू शकत नाही.  
  • शेती काम करत असलेले डॉक्टर, इंजिनियर,वास्तु विशारद, वकील अशा व्यावसायिकांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. 
  • याचबरोबर दहा हजार रुपयांपेक्षा अधिक मासिक पेन्शन मिळणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकत नाही.

 

टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाशेतकरीनरेंद्र मोदीपीकराजस्थान