अमरावती :
पीएम मित्रा टेक्स्टाइल पार्कमुळे विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. 'कॉटन टू फॅब्रिक' या धोरणामुळे भव्यदिव्य मेगा टेक्स्टाइल पार्कमध्ये वस्त्रोद्योग निर्मितीला चालना मिळेल.
शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळेल आणि अमरावती जिह्यातील तीन लाख लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, असे मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी(२० सप्टेंबर) रोजी व्यक्त केले. त्यांच्या हस्ते वर्धा येथून नांदगाव पेठ येथील पीएम मित्रा पार्कचे ई- भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी मंचावर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री जितनराम मांझी, जयंत चौधरी, उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, आ. दादाराव केचे, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, माजी खासदार रामदास तडस आदींची उपस्थिती होती.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, पीएम मित्रा टेक्स्टाइल पार्क ही वस्त्रोद्योग क्षेत्रात क्रांती आणणारी योजना आहे. नांदगाव पेठ येथे थेट शेतातून विदेशात निर्यात होणारे कापड निर्मितीकरिता जागतिक दर्जाच्या औद्योगिक पायाभूत निर्माण करण्यात येतील. पीएम मित्रा टेक्स्टाइल पार्कमुळे अमरावतीचे नाव देशाच्या नकाशावर अधोरेखित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
१० हजार कोटींची गुंतवणूक
• नांदगाव पेठ येथील अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्रात एक हजार हेक्टर जागेमध्ये पीएम मित्रा पार्क उभारण्यात येणार आहे.
• येथे १० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे.
• निर्यात क्षमता वाढीसाठी 'फाइव्ह एफ व्हिजन' आहे. यामध्ये 'फार्म ते फायबर', 'फायबर ते फॅब्रिक', 'फॅब्रिक टू फॅशन' आणि 'फॅशन ते फॉरेन' अशा पद्धतीने कार्यप्रणाली राबविण्यात येणार आहे.