PM Surya Ghar Yojana :
राज्यात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवून २५ हजार ८६ ग्राहकांनी १०१.१८ मेगावॅट क्षमतेची यंत्रणा उभारली आहे. राज्याने १०० मेगावॅटचा टप्पा या योजनेत पार केला आहे.
महावितरणच्या माध्यमातून मोफत सूर्यघर योजना राज्यभरात राबवली जात आहे. या योजनेत केंद्र सरकारच्या वतीने ३ किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पासाठी ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी मिळते. आतापर्यंत राज्यात २५ हजार ८६ ग्राहकांनी सौर प्रकल्प बसविले असून, त्यांना त्यांच्या अनुदानाची १६० कोटी रुपयांची रक्कम थेट हस्तांतरित करण्याचे काम सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजना जाहीर केली. राज्यात २० लाख घरांवर रूफ टॉप सोलार यंत्रणा उभारण्याचे उद्दिष्ट दिले आहे. निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रति किलोवॅट ३० हजार रुपयेप्रमाणे २ किलो वॅटपर्यंत अनुदान मिळते. ३ किलोवॅटपर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी १८ हजार रुपयांचे अनुदान मिळते. ३ किलोवॅटपेक्षा मोठ्या प्रकल्पासाठी ७८ हजार रुपयांच्या अनुदानाची मर्यादा आहे. महावितरण तर्फे रूफ- टॉप सोलार बसविणाऱ्या ग्राहकांना नेट मीटर दिले जाते. त्याचप्रमाणे १० किलोवॅटपर्यंत क्षमतेसाठी त्वरित स्वयंचलित मंजुरीही देण्यात येते. जास्तीत जास्त ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
साडेतीन लाख ग्राहकांची नोंदणी * पंतप्रधान मोफत सूर्यघर योजनेमध्ये राज्यभरात ३ लाख ५१ हजार ९४२ ग्राहकांनी योजनेच्या पोर्टलवर नोंदणी केली आहे.* २ लाख ३३ हजार ४३१ ग्राहकांनी महावितरण पोर्टलवर अर्ज केला आहे. या योजनेमध्ये ग्राहकांच्या गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यास वीजबिल शून्य होते.