Join us

Pockra Scam : पोकरा घोटाळा : तत्कालीन कृषी अधिकारी शीतल चव्हाण निलंबित;  भ्रष्टाचार करूनही बढती कशी? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 12:50 PM

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने (पोकरा) त कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्यासंबंधी 'लोकमत ऍग्रो'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तमालिकेची शासनाने दखल घेत जालना येथील तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी निलंबीत वाचा सविस्तर (Pockra Scam)

Pockra Scam :

बापू सोळुंके :

 छत्रपती संभाजीनगर:  नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने (पोकरा) त कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्यासंबंधी 'लोकमत ऍग्रो'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तमालिकेची शासनाने दखल घेत जालना येथील तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी आणि सध्या सोलापूर येथे 'आत्मा'च्या संचालकपदी कार्यरत असलेल्या  शीतल चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

चव्हाण यांच्या निलंबनाचे आदेश कृषी विभागाने २३ सप्टेंबर रोजी जारी केले.नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत शेतकऱ्यांना शेडनेट, शेततलाव, सूक्ष्म सिंचन योजना सेट, कोल्ड स्टोअरेज वाहन, मधुमक्षिका पालन अशा योजना अनुदानावर दिल्या होत्या. 

निलंबित करून सहसंचालक कार्यालयाशी संलग्न

• शीतल चव्हाण यांच्या निलंबन आदेशात पुणे येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाशी त्यांना संलग्न करण्यात आले. निलंबन कालावधीत त्यांना पुणे कृषी सहसंचालकांच्या परवानगीशिवाय पुणे शहर सोडता येणार नाही.

• निलंबन कालावधीत त्यांना कोणताही उद्योग, व्यवसाय अथवा नोकरी करता येणार नाही, असे बजावण्यात आले आहे.

योजनांचा लाभ देताना नियम पायदळी

लाभार्थी शेतकऱ्यांना आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना या योजनांचा लाभ देताना मोठ्या प्रमाणात नियम पायदळी तुडविण्यात आले. शिवाय अधिकची रक्कम लाभार्थ्यांना अदा करण्यात आली.

याविषयी काही लोकांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्यांनतर दक्षता पथकाने जालन्यात जाऊन चौकशी केली होती, तेव्हा शीतल चव्हाण, रामेश्वर भुते आणि व्यंकट टक्के या अधिकाऱ्यांनी शासनाचे १ कोटी २८ लाख रुपयांचे नुकसान केल्याने त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करण्याचा अहवाल दक्षता पथकाने शासनाला दिला होता.

हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरही कृषी आयुक्तालयातील झारीतील शुक्राचाऱ्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. याविषयी 'लोकमत ऍग्रो' ने 'पोकरा घोटाळा जालन्यातही' या टॅगलाइनखाली वृत्तमालिका प्रकाशित केली. 

या वृत्तमालिकेने कृषी विभागात खळबळ उडाली. कृषी आयुक्तालयाच्या भूमिकेविषयीही स्वतंत्र वृत्त लोकमतने दिले होते. यानंतर जागे झालेल्या कृषीच्या आयुक्तालयाने गोपनीय अहवाल पाठवून कारवाई प्रस्तावित केली. शासनाने २३ सप्टेंबर रोजी शीतल चव्हाण यांच्या निलंबनाचे आदेश काढले.

टॅग्स :शेती क्षेत्रसरकारी योजनाशेतकरीशेतीजालना