Join us

किडनाशके फवारणी दरम्यान झालेली विषबाधा, लक्षणे आणि प्रथमोपचार

By बिभिषण बागल | Published: August 18, 2023 1:06 PM

कीडनाशके कशी फवारावीत यावर वेळोवेळी जनजागृती केली जाते तरीही आपणाला कीडनाशके फवारणी आणि विषबाधा या बातम्या पाहायला मिळतात.

कीडनाशके सुरक्षितरीत्या कसे फवारावे याचे अज्ञान आणि फवारताना केली जाणारी घाई हे शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या जीवावर बेतू शकते. यासाठी कीडनाशके कशी फवारावीत यावर वेळोवेळी जनजागृती केली जाते तरीही आपणाला कीडनाशके फवारणी आणि विषबाधा या बातम्या पाहायला मिळतात.

किडनाशक फवारणी दरम्यान झालेली विषबाधा त्याची लक्षणे व घ्यावयाची काळजी आणि उपाययोजना याविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया.

लक्षणे

१) अशक्तपणा, चक्कर येणे.२) त्वचेची, डोळ्यांची जळजळ होणे, दाह होणे, जास्त घाम येणे, डोळ्यातून सारखे पाणी येणे, अंधुक दिसणे.३) तोंडातून लाळ गळणे, तोंडाची, चेहऱ्याची आग होणे, मळमळ व उलटी होणे, हगवण लागणे, पोटात दुखणे.४) डोकेदुखी, अस्वस्थ वाटणे, स्नायुदुखी, जीभ लुळी पडणे, बेशुद्ध होणे, धाप लागणे, छातीत दुखणे, एक सारखा खोकला येणे.

विषबाधेनंतर त्वरित करावयाचे प्रथमोपचार व घ्यावयाची काळजी

१) विषबाधा झाल्याची लक्षणे दिसून येताच वेळ न घालवता बाधित व्यक्तिला अपघात स्थळापासून सावलीच्या ठिकाणी न्यावे व ताबडतोब प्रथमोपचार करावे. शक्य होईल तेवढ्या लवकर बाधित व्यक्तिला दवाखान्यामध्ये घेऊन जावे.२) किडनाशक डोळ्यात उडाल्यास त्वरित डोळे स्वच्छ पाण्याने ५ मिनिटे चांगले धुवत राहावे.३) किडनाशक अंगावर उडलेले असल्यास त्वरित साबण लावून स्वच्छ पाण्याने ते अंग धुवून घ्यावे व कोरड्या टॉवेलने पुसून घ्यावे.४) विषबाधित व्यक्तिला जास्त घाम येत असल्यास कोरड्या टॉवेलने घाम पुसत राहावे. विषबाधित व्यक्तिला थंडी वाजत असल्यास अंगावर पांघरून द्यावे.५) किडनाशक तोंडात व पोटात गेलेले असल्यास बाधित व्यक्तिला त्वरित उलटी करण्यास प्रवृत्त करावे.६) विषबाधित व्यक्तिला पिण्यासाठी दूध, इतर खाद्य पदार्थ देऊ नये.७) विषबाधित व्यक्तिचा श्वासोच्छवास योग्य प्रकारे सुरू आहे का ते तपासावे. श्वासोच्छवास अनियमित किंवा बंद झाल्यास त्वरित बाधित व्यक्तिला कृत्रिम श्वासोच्छवास देऊन शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न करावे.८) विषबाधित व्यक्तिला झटके येत असल्यास त्याच्या दातामध्ये मऊ कापडची गुंडाळी टाकावी.९) विषबाधित व्यक्ति बेशुद्ध असल्यास त्याला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न करावे परंतु काहीही खाऊ घालण्याचे प्रयत्न करू नये.१०) विषबाधित व्यक्तीस त्वरित बाधा झालेल्या किडनाशकाच्या माहितीसह दवाखान्यात दाखल करावे व सर्व इतिवृतांत डॉक्टरांना सांगावा.११) विषबाधित व्यक्ती बरा झाल्यानंतर त्याची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घ्यावी व पुर्णपणे बरा झाल्यावरच त्या व्यक्तिला घरी न्यावे.१२) अधिक माहिती करिता कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषि विभागातील अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांचेशी संपर्क साधावा. 

टॅग्स :शेतकरीशेतीकीड व रोग नियंत्रणसरकार