छत्रपती संभाजीनगर : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतील (पोकरा) मधुमक्षिका पालन आणि शेडनेट बांधल्याचे कागदोपत्री दाखवून लाखो रुपयांचे अनुदान लाटणाऱ्या जिल्ह्यातील १५४ शेतकऱ्यांकडून अनुदान रकमेची वसुली करण्यासाठी त्यांच्या सातबारांवर अपहार केलेल्या रकमेचा बोजा चढविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. कृषी विभागाकडून पोकरा घोटाळ्यातील शेतकऱ्यांची यादी महसूल विभागाला पाठवली जाणार आहे.
२०१८ ते २०२४ कालावधीत पोकरा योजनेचा पहिला टप्पा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध गावांत राबविण्यात आला. पोकरातील विविध योजनांचा लाभ घेताना पैठण आणि कन्नड, सिल्लोड तालुक्यांत अपहार झाला होता. पैठण तालुक्यातील पोकरा घोटाळ्यावर लोकमतने गतवर्षी वृत्त मालिका प्रकाशित केली होती. या वृत्त मालिकेची दखल घेत कृषी विभागाने चौकशी समिती नियुक्त केली होती.
या चौकशीत पोकरातील विविध योजनांच्या घोटाळ्यावर शिक्कामोर्तब झाले होते. छत्रपती संभाजीनगर कृषी उपविभाग आणि सिल्लोड कृषी उपविभागांतर्गत असलेल्या विविध गावांत मधुमक्षिका पालन या योजनेचा ८२ शेतकऱ्यांनी कागदोपत्री लाभ घेतल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. या शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संगनमताने योजनेतील लाखो रुपयांचे अनुदान लाटले. अशाच प्रकारे जिल्ह्यातील विविध गावांतील ७२ शेतकऱ्यांनी शेडनेट उभारल्याचे कागदोपत्री दाखवून लाखो रुपयांचे अनुदान लाटल्याचे जानेवारी महिन्यात केलेल्या तपासणीतून उघडकीस आले होते.
या शेतकऱ्यांकडून आता त्यांनी लाटलेल्या अनुदानाची रक्कम वसूल करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नुकताच घेण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. ज्या शेतकऱ्यांनी अनुदानाची रक्कम परत केली नाही, त्यांच्या शेतीच्या सातबाऱ्यावर त्यांनी लाटलेल्या अनुदानित रकमेचा बोजा चढविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यामुळे कृषी विभाग पोकरा घोटाळ्यातील शेतकऱ्यांची यादी महसूल विभागाला देत आहे.
घोटाळेबाज अधिकारी, कर्मचाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न?
छत्रपती संभाजीनगर आणि पैठण उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत पोकरामध्ये गैरव्यवहार झाला. या घोटाळ्यातील संबंधित शेतकऱ्यांकडून वसुली सुरू करण्याचा निर्णय झाला. असे असले, तरी या घोटाळ्यातील संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून सुरू असल्याचे दिसून येते. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा अपहार झाल्याची चर्चा आहे, असे असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई आतापर्यंत झाली नाही.