Join us

झळा, पाणीटंचाईने डाळिंबाच्या बागा उजाड, शेतकरी फिरवताहेत डाळिंबाच्या झाडावर कुऱ्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 11:00 AM

दुष्काळी भागात उपाययोजनेचा अभाव

मार्च महिन्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने विकत पाणी घेऊन फळबागा वाचविण्यासाठी प्रयत्न असफल होत असल्याने शेतकरी डाळिंबाच्या झाडांवर कुन्हाड फिरवत आहेत. जिवापाड जपलेली बाग तोडताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर होत आहेत.

लाडसावंगी परिसरातील शेतकरी पूर्वीपासून फळबागायतदार आहेत. लाडसावंगी परिसरात दुधना नदीचे पात्र असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फळबागा लावलेल्या आहेत. मात्र, २०१२ नंतर पुन्हा यंदा दुष्काळ पडल्याने विहिरीत पाणी तळाला गेले आहे.

केवळ जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत असल्याने फळबागा वाचविण्यासाठी तीन महिने विकत पाणी घेऊन बागा वाचविण्याएवढा पैसा शिल्लक नाही. यात दुष्काळ असूनही शासनाने कोणत्याही उपाययोजना न केल्याने बागा जगविणे अवघड असल्याने शेतकरी फळबागांवर कुन्हाड फिरवत आहेत. यात लोकसभेच्या निवडणुकाअसल्याने लोकप्रतिनिधी निवडणूक तयारीत व्यस्त आहेत. याकडे ना सत्ताधारी, ना विरोधक पंचवीस टक्के रक्कम खात्यात जमा लक्ष देत आहेत. खरिपाचा विमा मंजूर होऊनही मोजक्या शेतकऱ्यांना केवळ झाली, बाकी रक्कम केव्हा मिळणार. शिवाय विमा कंपनीतील कर्मचाऱ्यांनी मोबाईल बंद करून ठेवल्याने विमा कधी मिळणार हे कळत नसल्याने शेतकरी फळबागांवर कुन्हाड फिरवत आहेत.

हजार डाळिंबाची बाग कापली माझ्याकडे एक हजार डाळिंब झाडांची बाग होती. ती सहा वर्षांपासून जिवापाड जपली. परंतु विहिरीत पाणी नाही. पाऊस चांगला पडला नसल्याने शेततळे भरता आले नाही. पाणी विकत घेऊन झाडे जगविणे कठीण असल्याने झाडे तोडून टाकली.- कृष्णा पडूळ, लाडसावंगी शेतकरी

दोन वर्षांपासून रोगराई

मागील दोन वर्षापासून डाळिंबाच्या बागांवर प्लेग, करपा, बुरशी, तेल्या आदींसह विविध रोग पडत असल्याने उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत होता. यात यंदा दुष्काळाची भर पडल्याने सातशे झाडांची डाळिंब बाग तोडून टाकली.-राजेंद्र पवार, शेतकरी लाडसावंगी

तोडीचे असेही जुगाड

काही व्यापारी शेतकऱ्यांना मोफत झाडे तोडून देतात. झाडांचा जागेवरच भुसा तयार करुन शेंद्रा डी.एम.आय.सी. मध्ये विक्री करून वाहनाचे भाडे व झाडे तोडीची मंजुरी निघत आहे. यात शेतकऱ्यांना झाडे तोडणी खर्च बचत होत असल्याने शेतकरी व्यापाऱ्यांकडून बाग तोडणी करुन घेत आहेत. वरिष्ठांनी दखल घेऊन फळबागा वाचविण्यास अनुदान देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

टॅग्स :शेतीपाणीकपातशेतकरी