Join us

विमा कंपनीचा भोंगळ कारभार, केळी उत्पादक शेतकऱ्याचा प्रस्ताव नाकारला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 10:49 AM

केळी उत्पादक शेतकऱ्याच्या शेतात गेल्या वर्षाच्या केळीचे घड अजूनही शिल्लक असताना विमा कंपनीने प्रस्ताव नाकारले असल्याचे समोर आले आहे.

जळगाव : हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेंतर्गत विमा कंपनीकडून शेतकऱ्यांचे मनमानी पद्धतीने विम्याचे प्रस्ताव नाकारण्यात येत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. जळगाव तालुक्यातील पिलखेडा येथील एका शेतकऱ्याच्या शेतात गेल्या वर्षाच्या केळीचे घड अजूनही शिल्लक असताना विमा कंपनीने पत्र पाठवून, तुमच्या शेतात केळी लागवड केली नसल्याचे सांगत विमा रद्द करण्यात आल्याचे पत्र पाठविले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विमा कंपनीचा भोंगळ कारभार समोर आला आहे. 

महाराष्ट्र शासनाकडून पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा दिला जात आहे. यासाठी काही कंपन्यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया केली जात आहे. मात्र अनेकदा पीक विमा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे इतर शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. केळी पीक विम्यांतर्गत नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांना मिळू नये, यासाठीच पीक विमा कंपनीचा खटाटोप सुरू असल्याचे चित्र आहे. कारण, अनेक शेतकऱ्यांनी शेतात केळी पीक नसतानाही विमा काढला असल्याचा दावा करत विमा कंपनीकडून शेतकऱ्यांचे प्रस्ताव नाकारले जात आहेत. मात्र, हे प्रस्ताव नाकारत असताना कोणतेही पुरावे शेतकऱ्यांना दिले जात नाहीत, असें आरोप हॉट आहेत. 

दरम्यान जळगाव जिल्ह्यातील पिलखेडा येथील नितेश विनोद चौधरी या शेतकऱ्याबाबत पीक विमा कंपनीने गौडबंगाल केले आहे. या शेतकऱ्याने केळीची लागवड केली होती. मात्र अवकाळी पावसाच्या कचाट्यात सापडल्याने मोठे नुकसान झाले होतो. या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी चौधरी यांनी पीक विमा अर्ज भरला होता. सोबत शेतातील जीव टॅगिंग फोटो देखील जोडला होता. मात्र केळीचे घड शेतात असतानाही त्याला विमा कंपनीने पत्र पाठवून, शेतात केळी लागवड नसताना पीक विमा काढला असल्याचे सांगत पीक विम्याचा प्रस्ताव नाकारला आहे, त्यामुळे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. आता पीक विमा कंपनी प्रत्यक्षात येऊन पाहणी करणार का? हे पाहावे लागणार आहे. 

केळीचा बेल्ट असलेल्या भागातीलच विमा नाकारला...

विमा कंपनीकडून ज्या भागातील शेतकऱ्यांचे विम्याचे प्रस्ताव नाकारले आहेत तो भाग केळीचा बेल्ट मानला जातो. चोपडा तालुक्यातील वढोदा, विटनेर, मोहिदा, जळगाव तालुक्यातील भोकर, गाढोदा, आव्हाणे, पळसोद, सावखेडा, किनोद, करंज, नंदगाव, पिलखेडा आणि याच भागातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे विम्याचे प्रस्ताव विमा कंपनीने फेटाळले आहेत. ज्या भागात मात्र केळी लागवड कमी होते किवा होतच नाही, अशा भागातील मात्र केळीचा विमा मंजूर करण्यात आला आहे.

40 गावांमधील केळी उत्पादक आक्रमक 

ज्या गावांमधील शेतकयांचे विम्याचे प्रस्ताव नाकारण्यात आले आहेत. त्या भागातील सुमारे 40 गावांमधील शेतकऱ्यांकडून आपल्या शेतात केळी लागवड होते, याबाबतचे फोटो विमा कंपनीकडे पाठविण्याची तयारी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. यासह न्यायालयातदेखील याचिका दाखल करण्यासाठी काही विधीतज्ञांचीही भेट शेतकऱ्यांनी घेतली आहे. गेल्या वर्षाची केळी अजूनही शेतात असतानाही चिमा नाकारला जात असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

प्रक्रिया कशी असते? 

शासन निर्णयातील अ. क्र.8  नुसार विमा कंपन्यांनी पिक विमा योजनेच्या संकेतस्थळावरील (पी एम एफ बी वाय पोर्टलवरील) शेतकरी सहभागाच्या (विमा हप्ता भरून घेतल्यानंतर) अंतिम दिनांक (31 ऑक्टोबर 2022) पासुन पुढील ६० दिवसाच्या आत (म्हणजे 31 डिसेंबर 2022)  पर्यंत माहिती मंजुर करणे क्रम प्राप्त होते. (म्हणजेच अप्रूव्हल करणे किंवा रिजेक्ट करणे वरील कालावधीत होणे अपेक्षित असताना असे न करता विमा कालावधी संपल्यानंतर एका वर्षाने प्रस्तावना कारणे हे शासन निर्णयाचे उल्लंघन आहे.)

पीक विमा कंपनीने शेतकऱ्याला पाठवलेले पत्र 

टॅग्स :जळगावकेळीपीक विमा