दत्ता म्हात्रे
पेण : पेणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या पुणे जिल्ह्यातून पावट्याची आवक होत आहे. १२५ ते १५० रुपये किलो असे दर आहेत. पावटा महागला आहे तरी पेणकरांकडून मागणी असून पोपटची बेत आखले जात आहेत.
पेणमधील पावट्याच्या शेंगा पोपटीसाठी लज्जतदार असतात. हा पावटा बाजारात येण्यासाठी आणखी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील चाकण व सावड येथून पावट्याची वीकेंडला आवक होत आहे.
त्यामुळे पोपटी करण्यासाठी तरुणाईमध्ये लगबग वाढली आहे. पेण कृषी उत्पन्न बाजार समितीतील विक्रेते १२५ ते १५० रुपये प्रतिकिलो या दराने पावट्याचे शेंगा विक्री करीत आहेत.
पेण ग्रामीणमधील खरोशी, दूरशेत, पाबळ खोरे, वरसई खोरे, वरसई या भागात वाल पावट्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. पण सध्या हे नवे पीक बाजारात जानेवारीमध्ये येणार आहे. त्यानंतर दरही कमी होणार आहेत.
वालाचे पीक कधी घेतात?
पाण्यावरील वाल आणि दवावरील वाल असे दोन प्रकार आहेत. यातील दवावर पिकविण्यात येणारे वाल जानेवारी अखेरपर्यंत बाजारात येतात आणि पोपटीचा हंगाम हिवाळ्यात सर्रास केला जातो. सद्याचे पावट्याचे पीक हे पाण्यावरचे आहे. जेवढा गारवा तेवढे पीक जास्त आणि जोमात मते असे शेतकऱ्यांचा एकंदरीत अंदाज आहे.
पोपटी कशी करतात?
१) पोपटी शाकाहारी आणि मांसाहारी अशी दोन्ही प्रकारची असते.
२) शेताच्या बांधावर भांबुर्डीचा पाला एका मातीच्या मडक्यात भरला जातो.
३) त्यात वालाच्या, मटारच्या शेंगा, मीठ आणि पुन्हा वर पाला असे थर रचतात.
४) यासह चिकन, अंडीही ठेवून मडक्याचे तोंड गच्च बांधले जाते.
५) एखादी चांगली जागा बघून तेथे मडके जमिनीवर उलटे ठेवतात.
६) या मडक्यावर, आजूबाजूला भाताची सुकलेली पेंडी, शेतातील सुका पालापाचोळा, गवत टाकून आग पेटवली जाते.
७) पाण्याचा अजिबात वापर होत नाही.
८) आगीच्या वाफेवर पोपटी शिजते.
ग्रामीण संस्कृतीचा खाद्य प्रकार म्हणून कोकणातील पोपटी प्रसिद्ध झाली आहे. थंडीचे दिवस सुरू झाले की खवय्यांना पोपटीचे वेध लागतात. त्यात वालाच्या शेंगा बाजारात आल्या की बेत ठरतात.
नाताळ आणि थर्टी फस्ट वर्षाअखेर आणि नववर्ष २०२५ सेलिब्रेशन करताना रात्री शेकोट्या पेटवून या वेळेस पोपटी लावण्यात तरुणाई आघाडीवर असते. सरते वर्षाला निरोप आणि नव वर्षाचे स्वागतासाठी पोपटीचा बेत किंबहुना स्पेशल दिवस म्हणून पावटा वालाच्या शेंगाची बाजारात चलती असणार आहे. - जोमा दरवडा, भाजीपाला उत्पादक, पेण
अधिक वाचा: काय सांगताय! कारल्यापासून करता येतोय चहा, कसा बनवाल वाचा सविस्तर