Join us

जगाचा पोशिंदा शेतकरी खऱ्या अर्थाने आर्थिक संपन्नतेसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापर गरजेचा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 12:11 PM

देशातील कृषी उत्पादनवृद्धीसाठी प्रगत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अतिशय महत्त्वाचे आहे. अकोला विद्यापीठात शिवार फेरीत शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली.

अकोला

देशातील कृषी उत्पादनवृद्धीसाठी प्रगत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अतिशय महत्त्वाचे आहे. शिवारफेरीचे आयोजन तर्कसंगत कृषी उत्पादनवाढीच्या दृष्टीने कृषी तंत्रज्ञान हस्तांतरण व अवलंबामधील महत्त्वाचा पैलू असल्याचे सांगताना, जगाचा पोशिंदा शेतकरी खऱ्या अर्थाने आर्थिक संपन्न होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरासह बाजारपेठेच्या मागणीनुसार शेती कौशल्य विकसित करणे काळाची गरज असल्याचे मत कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी व्यक्त केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत तीन दिवसीय शिवारफेरीचे उद्घाटन शुक्रवारी(२० सप्टेंबर) रोजी झाले.  याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. शिवारफेरीच्या पहिल्या दिवशी १० हजारांहूनही अधिक शेतकऱ्यांनी भेट दिली. नवीन तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना यावेळी देण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेचे महासंचालक रावसाहेब भागडे, भारत सरकारच्या नीती आयोगाचे माजी सदस्य व्ही. व्ही. सदामते, आमदार किरण सरनाईक, आमदार अमोल मिटकरी, विठ्ठल सरप, जनार्दन मोगल, हेमलता अंधारे, डॉ. वाय. जी. प्रसाद, संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी डॉ. श्यामसुंदर माने, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे येथील संचालक शिक्षण तथा संशोधन डॉ. हरिहर कौसडीकर, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, नागपूर विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावार, अमरावती विभागीय कृषी सहसंचालक किसनराव मुळे, कुलसचिव सुधीर राठोड, विद्यापीठ अभियंता सतीश देशमुख, विद्यापीठ नियंत्रक प्रमोद पाटील यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती लाभली होती.

शिवारफेरीतील महत्त्वाचे मुद्दे

* विद्यापीठाचे शेतकरी सदन येथे शेतकऱ्यांनी नोंदणीस सुरुवात करीत नोंदणीनंतर विद्यापीठाच्या वाहनाद्वारे नियोजित २४ संशोधन विभागांना प्रत्यक्ष भेटी देत अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान जाणून घेतले व उपस्थित शास्त्रज्ञांकडून शंका समाधान केले.

* यंदादेखील अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवारफेरीचे नियोजन करण्यात आले असून, गहू संशोधन विभागाचे २० एकर प्रक्षेत्रावर एकाच ठिकाणी खरीप पिकांचे विविध जातीचे पीक प्रात्यक्षिक घेण्यात आले आहेत.

* त्यामध्ये एकूण २१० विविध पिकांच्या जाती लावण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने तेलबिया, कडधान्य, तृणधान्य, कापूस, चारापिके, भाजीपाला पिके व फुलांच्या जाती आदींचा समावेश आहे.

 

टॅग्स :शेती क्षेत्रअकोलाकृषी विज्ञान केंद्रशेतकरीशेतीविदर्भ