Pune : फळबाग किंवा रासायनिक शेतीमध्ये फवारणी करताना पीपीएम द्रावण हा शब्द प्रत्येक शेतकऱ्याने ऐकलाच असेल. फवारणी करताना औषधांच्या वापराबाबत पीपीएम हे एकक खूप महत्त्वाचे आहे. कंपनीने केलेल्या शिफारशीनुसार आपल्याला संबंधित संजिवकाचे किंवा जीए म्हणजेच (जिब्रेलिक अॅसिडचे) पीपीएम द्रावण तयार करावे लागते. पण हे पीपीएम म्हणजे नेमके काय? पीपीएम द्रावण कसे तयार करायचे? यासंदर्भात जाणून घेऊयात.
पीपीएम म्हणजे पार्ट पर मिलियन. म्हणजेच १० लाखांतील एक भाग १ लीटर पाण्यातील १ मिलीग्रॅम एवढा भाग. १० लाख मिलीग्रॅम म्हणजेच एक लीटर होय. हे एकक औषधे फवारणीसाठी किंवा इतर वापरासाठीसुद्धा वापरले जाते. संजीवके, संप्रेरके किंवा जीए यांच्या फवारणीसाठी आपल्याला पीपीएम या युनिटमध्ये द्रावण तयार करावं लागतं. शेतकऱ्यांसाठी १० पीपीएम, २० पीपीएम, ५० पीपीएम, १०० पीपीएम या एककानुसार फवारणी करण्याचं सांगितलं जातं.
कसे तयार करावे पीपीएमचे द्रावण?१०० लीटर पाण्यामध्ये १ ग्रॅम संप्रेरक किंवा जीए टाकल्यास १० पीपीएमचे द्रावण तयार होते. १०० लीटर पाण्यात २ ग्रॅम संप्रेरक किंवा जीए टाकल्यास २० पीपीएमचे द्रावण तयार होते. १०० लीटर पाण्यात ५ ग्रॅम संप्रेरक किंवा जीए टाकल्यास ५० पीपीएमचे द्रावण तयार होते. २०० लीटर पाण्यात १ ग्रॅम संप्रेरक किंवा जीए टाकल्यास ५ पीपीएमचे द्रावण तयार होते. २०० लीटर पाण्यात २ ग्रॅम संप्रेरक किंवा जीए टाकल्यास १० पीपीएमचे द्रावण तयार होते.