Join us

पेरणीपुर्वी बियाणावर बीज प्रक्रिया केल्याने पीक उत्पादनात होते १५-२०% वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 1:40 PM

ज्यांनी अजूनही पेरणी केलेली नाही किंवा ज्यांना पेरण्या करायच्या आहेत, त्या शेतकऱ्यांनी हे अवश्य वाचावे.

 प्रयोगशाळेत नत्र स्थिर करणारे, जमिनीतील स्फुरद विरघळविणारे व सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे कार्यक्षम जिवाणूंची स्वतंत्रपणे वाढ करून योग्य अशा वाहकात मिसळल्यानंतर होणारे मिश्रण म्हणजे जिवाणू खत. या खताला जिवाणू संवर्धन असेही म्हणतात. या जिवाणू खतांची पेरणीपूर्वी बियाणावर बीज प्रक्रिया केल्याने पीक उत्पादनात १५-२०% वाढ होते.

नत्र स्थिरिकरण करणारे जिवाणू खते -१. ॲझोटोबॅकटर     हे जिवाणू हवेतील मुक्त नत्र शोषून पिकाला उपलब्ध करुन देतात. हे जिवाणू खत ज्वारी, बाजरी, मका, सूर्यफूल इ. पिकांसाठी बीज प्रक्रियेकरिता वापरतात. 

२. ॲझोस्पिरिलम -     हे जिवाणू खत ज्वारी व मका पिकांसाठी बीज प्रक्रियेच्या स्वरुपात वापरतात.

३. रायझोबियम -     हे जिवाणू शेंगवर्गीय पिकांच्या मुळावर गाठी निर्माण करतात. हवेतील नायट्रोजन शोषून मुळांवाटे पिकास उपलब्ध करुन देतात. वेगवेगळ्या सात गटातील पिकांना विशिष्ट प्रकारच्या रायझोबियम गटाचे जिवाणू खत वापरावे.

स्फुरद विरघळविणारे जिवाणूस्फुरद विरघळविणारे जिवाणू खते (संवर्धने) अविद्राव्य स्थिररुपी स्फुरदाचे द्राव्य रासायनिक स्वरुपात रुपांतर करुन ते पिकांना उपलब्ध करुन देतात.     वरील सर्व जिवाणू खतांचा / संवर्धनांचा बीज प्रक्रिया म्हणून वापर करताना १० किलो बियाणासाठी २५० ग्रॅम या प्रमाणात वापरावे.

ट्रायकोडर्मा -     या जैव रोग नियंत्रकाच्या वापराने जमिनीद्वारे होणारे रोग प्रभावीपणे नियंत्रण करता येतात. त्यासाठी १० कि. ग्रॅ. बियाणासाठी ४०-५० ग्रॅम ट्रायकोडर्मा वापरावे.

डॉ. कल्याण देवळाणकर, नाशिक 

टॅग्स :खरीपपेरणीशेती