कांदा पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी रोपवाटिका व तिचे व्यवस्थापन हे योग्य पद्धतीने करणे फार महत्त्वाचे असते. कारण निरोगी आणि सुदृढ रोपांवरच पुढील कांद्याचे उत्पादन अवलंबून असते. त्यामुळे कांद्याच्या रोपवाटिकेचे व्यवस्थापन हे शास्त्रीय पद्धतीने आणि व्यवस्थित करणे फार महत्त्वाचे असते. शेतकऱ्यांनी रब्बीकांदा पिकासाठी रोपवाटिका तयार करताना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.
१) एक हेक्टर कांदा लागवडीसाठी साधारणपणे ०.०५ हेक्टरवर कांदा रोपवाटिका तयार करावी.
२) चांगले कुजलेले अर्धा टन शेणखत जमिनीत टाकावे व त्याबरोबर ४० किलो निंबोळी खत टाकावे.
३) कांदा पिकासाठी रोपवाटीका तयार करण्यासाठी गादीवाफ्याचा वापर करावा. वाफे १०-१५ सें.मी. उंचीचे, एक मीटर लांब व रूंद वाफे तयार करावे.
४) कांदा बियाणे टाकण्यापूर्वी पेंडामेथलीन या तणनाशकाचा २ मि.ली./लिटर या प्रमाणात वापर करावा.
५) कांदा बियाणे बीजप्रक्रियेसाठी थायरम किंवा कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकांचा २ ते ३ ग्रॅम/किलो बियाणे या प्रमाणात वापर करावा.
६) ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक २ लीटर/एकर याप्रमाणे जमीन ओली असताना द्यावे.
७) बियाणे पेरण्यापूर्वी ४ किलो नायट्रोजन, १ किलो फॉस्फरस व १ किलो पोटॅश बियाणे टाकण्याअगोदर जमिनीत टाकावे.
८) रोपांची मर होत असेल तर मेटालॅक्जील किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम/लिटर किंवा कॅप्टन किंवा थायरम २ ग्रॅम/लिटर या प्रमाणे फवारणी किंवा अळवणी करणे गरजेचे आहे.
९) रोपवाटिकेत रोपांना पिळ पडणे किंवा रोपावरील करपा आढळुन आल्यास कार्बेन्डाझिम २ ग्रॅम/लिटर किंवा मॅन्कोझेब २.५ ग्रॅम/लीटर पाणी याप्रमाणे आलटून पालटून फवारणी करावी.
१०) कांद्याच्या रोपामध्ये फुलकिडे किंवा थ्रीप्स दिसत असल्यास फिप्रोनिल १ मि.ली. किंवा प्रोफेनिफॉस १ मि.ली. किंवा कार्बोसल्फान १ मि.ली. /लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
डॉ. दत्तात्रय गावडे
विषयतज्ञ, पीक संरक्षण, कृषि विज्ञान केंद्र, नारायणगाव (पुणे-२)