पुणे : जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र सुमारे २ लाख हेक्टर आहे. गेल्या तीन हंगामात सुमारे ३० हजार क्विंटल बियाणांची विक्री झाली असून, यावर्षी ३६ हजार क्विंटल बियाणांच्या मागणीनुसार पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यावर्षी मागणीनुसार खताचा पुरवठा होत आहे. युरियाची मागणी पाहता जिल्ह्यात खतांचा १० हजार ३३० टन संरक्षित साठा करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यानुसार युरियाचा ९ हजार ४६० टन आणि डीएपीचा ८७० टनचा बफर साठा करण्यात येणार आहे. जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ही माहिती देण्यात आली.
आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, कीटकनाशके पुरेशा उपलब्धतेवर लक्ष द्यावे. बनावट बियाणे, खते, कीटकनाशके बाजारात येऊ नये, यासाठी अशा प्रकरणात तातडीने गुन्हे दाखल करत कठोर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. जिल्हा परिषदेचे सीईओ संतोष पाटील, विभागीय कृषी सहसंचालक रफिक नायकवडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे उपस्थित होते.
यावेळी काचोळे यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजना, पीएम किसान योजनेची ई-केवायसी, निविष्ठा गुणवत्ता नियंत्रण, कृषी यांत्रिकीकरण, फळबाग लागवड, राष्ट्रीय कृषी सिंचन योजना. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, अवेळी पाऊस आणि अन्य कारणांमुळे मार्चअखेर झालेल्या नुकसानीचे पैसे वितरण, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून देण्यात आलेले अनुदान आदी माहिती दिली.
तक्रार येईल तिथे लगेच तपासणी■ भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, ही बाब समाधानाची आहे, असे सांगून डॉ. दिवसे म्हणाले, कृषी विभागाने बियाणे, कीटकनाशके यांच्या बाबतीत जिथे तक्रार येईल तिथे लगेच तपासणी करत गुन्हे दाखल करावेत.■ खतनिर्मिती कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत बफर साठ्यासाठी त्यांना निश्चित करून दिलेला पुरवठा करावा. युरिया खताच्या वाहतुकीबाबत व पुरवठ्याबाबत नियोजन करावे. पीक कर्ज वाटपात जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केली असून, पुढेही अशीच कामगिरी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अधिक वाचा: श्रीगोंद्याच्या आढळगाव शिवारात दरवळला प्रथमच बडीशेपचा सुगंध