दिलीप कावरखे
यावर्षी हळदीला समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी हळद लागवड करण्याचा निर्णय घेतला; पण हळद लागवड करण्याच्या सुरुवातीलाच हळद बेण्याला पाच हजार रुपये क्विंटल भाव सांगितला जात असून, बेण्याचा तुटवडादेखील जाणवत आहे. मग हळदीची लागवड करावी तरी कशी, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.
यावर्षी पाऊस चांगला राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे खरीप हंगामात हळद पीक घ्यावे, असे शेतकऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे तर शेतकरी हळदीचे बेणे विकत घेऊ लागले आहेत. गतवर्षी बेण्याला २ हजार रुपये क्विंटल असा भाव होता. यावर्षी सुरुवातीपासूनच हळदीला १५ हजारांच्या वर भाव मिळत असताना बेण्याचा भावदेखील ३ हजारांनी वाढवून ठेवला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
दुसरीकडे काही झाले तरी यावर्षी हळदीला प्रथम क्रमांक दिला जाईल, असे शेतकरी म्हणू लागले असून, चांगल्या प्रकारे शेती मशागतीची कामे करीत हळद लागवडीची पूर्वतयारी शेतकरी जोमाने करू लागले आहेत.
शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे हळदीचे बेणे आहे, अशा शेतकऱ्यांनी ठराविक अंतरामध्ये हळद लागवड करीत बेणे वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच इतर शेतकऱ्यांना योग्य दराने बेणे उपलब्ध करून देत, एकमेकांना सहकार्य करावे, असे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
गत खरीप, रबी हंगामात शेतीमालाला भाव मिळाला नाही. त्यामुळे तर शेतकरी चिंतित आहेत. शासनाच्या दारी जाऊन अनेक शेतकऱ्यांनी विनंती केली; पण शासनाला पाझर काही फुटला नाही.
सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा या शेतीमालापेक्षा हळदीला समाधानकारक भाव मिळाला म्हणून हळद लागवड करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला असून, हळद लागवडीची तयारीही केली आहे; पण लागवडीच्या प्रारंभीच बेण्याचा भाव वाढून बसला असून, तुटवडा जाणवत असल्याने बेण्यासाठी शेतकऱ्यांना शोधाशोध करावी लागत आहे.
सद्यःस्थितीत शेती करणे सोपे राहिले नाही
दोन वर्षापासून कोणत्याही शेतीमालाला म्हणावा तसा भाव मिळत नाही. शेतीकामावर मजूर मिळत नाहीत. अशा परिस्थितीत शेती करावी तरी कशी? हा प्रश्न उपस्थित होतो आहे. - समाधान कावरखे, शेतकरी
गतवर्षी समाधानकारक पाऊस झाला नाही. यावेळेस चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे तर हळद लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे: पण बेणे महाग होऊन बसले आहे. त्यामुळे थोडी चिंता वाटत आहे. - संजय भुरभुरे, शेतकरी
'शेतकरी जगला तर देश जगेल' असे नुसते म्हटले जाते. वास्तविक पाहता कोणीही शेतकऱ्यांची समस्या जाणून घेत नाही. लोकप्रतिनिधींनी शेतीमालाला भाव जास्तीत जास्त कसा मिळेल, यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. - विठ्ठल राजे, शेतकरी
हेही वाचा - हळदीला मिरचीची दिली जोड; सुभाषरावांचे दोन्ही पिकातून उत्पन्न झाले गोड