Join us

खते, औषधांचे दर वाढतात; सोयाबीन, कापसाला भाव कधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 1:50 PM

साहेब ! महागाईच्या काळात शेतकऱ्यांचीही थोडी काळजी घ्या

आधीच नापिकी आणि त्यात कापूससोयाबीनचे दर गडगडले आहेत. त्यामुळे तर शेतकरी हवालदिल झाले आहेत. खते, औषधांचे दर वाढले जात असताना शेतीमालाकडे कोणीच लक्ष देत नाही, असेच दिसते आहे. महागाईच्या काळात शेतीमालाकडे ही लक्ष द्यावे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

वसमत तालुक्यात हमीभाव खरेदी केंद्र असावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून होऊ लागली आहे. पण हमीभाव खरेदी केंद्र अजूनही सुरू करण्यात आले नाहीत. याबाबीकडे लक्ष देण्यासाठी कोणीही समोर येत नाही. त्यामुळे मिळेल त्या दरात शेतीमाल शेतकऱ्यांना विकावा लागत आहे. परंतु दुसरीकडे खते, औषधांचे दर रोजच वाढताना दिसत आहेत. त्यामुळे तर लागवड खर्च जास्तीचा होतो आहे. या तुलनेत शेतीमालाचे दर का वाढत नाहीत? हा प्रश्न शेतकऱ्यांतून उपस्थित होतो आहे.

तालुक्यात गतवर्षी सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला होता. त्याबरोबर कापसाचा पेराही जास्तीचा झाला. यावर्षी जून महिन्यात पावसाने लहरीपणा सुरू केला. तसेच जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे सोयाबीन व कापसाचे मोठे नुकसान झाले. त्यातच पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे तर पिकांच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट झाली. 

एकीकडे बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशक आदींसह उत्पादन खर्चात कितीतरी पटींनी वाढ झाली असताना सोयाबीन व कापसाचे दर वाढेना झाले आहेत. दोन वर्षांपूर्वीचा अपवाद वगळता शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादनातून हाती काहीच लागत नाही. सद्यस्थितीत बाजार समित्यांत सोयाबीनला सरासरी ४४५० रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा भाव मिळत आहे. तर कापूस ७ हजारांच्या पुढे सरकेना झाला आहे. गतवर्षी कापूस ९ हजार रूपयांपर्यंत गेला होता. त्या मानाने यावर्षी कापसाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, पीककर्ज कसे फेडावे? अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. पीककर्जाचे पुनर्गठण करणे हा त्यावरील उपाय नव्हे, तर शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढविणारा आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. पण कोणीही लक्ष देत नाही.

व्यथा सांगावी तरी कुणाला हेच कळेना?

शेती करणे सध्या अवघड होऊन बसले आहे. वातावरणही साथ देत नाही, मजुरीही वाढली आहे. अशावेळी शेतीमालाला भाव मिळणे आवश्यक आहे.- बालाजीराव काळे, शेतकरी

दोन पैसे पदरात पडावे म्हणून शेतकरी रात्रंदिवस शेतात मेहनत करून पिकांची जोपासना करत आहे. पण शेतीमालाला म्हणावा तसा भाव मिळत नाही. त्यामुळे शेती न केलेली बरी असे म्हणण्याची वेळ आली आहे.- साईनाथ पतंगे, शेतकरी

टॅग्स :सोयाबीनकापूसशेतकरीमहागाई