एकीकडे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे परतीच्या व अवकाळी पावसाने उन्हाळी कांद्याचे रोपाचे नुकसान झाल्याने कांद्याच्या रोपांना सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. त्याचबरोबर कांदा रोपांना भाव आल्यामुळे कांदा लागवडीसाठी रोपांचा तुटवडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील येवला, निफाड, सिन्नर, लासलगाव यासह आजूबाजूच्या परिसरात कांद्याची लागवड केली जाते. यंदा अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक ठिकाणी कांदा पिकांचे नुकसान झाले. त्यात आता उन्हाळ कांद्याची लागवड सुरु झाली असून अशातच कांदा रोपांचा भाव वाढल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. यावर्षी उन्हाळी कांद्याला चांगल्यापैकी भाव नसला तरी शेतक-याने सप्टेंबर महिन्यात उन्हाळी व रांगडया कांद्याचे बियाणे टाकले होते. काही रोपे उगवली होती, तर काही नुकतेच टाकलेले होते.
परंतु ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे कांदा रोपांचे नुकसान झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा नव्याने जमीन तयार करून उन्हाळी व रांगडा कांद्याचे बियाणे टाकले, परंतु पुन्हा पंधरा दिवसांनी अवकाळी पाऊस झाल्यामुळे कांद्याच्या रोपांची नासाड़ी झाली. अवकाळी पाऊस गेल्यावर लागलीच कांद्याचे बियाणे टाकता आले नाही. परंतु काही शेतकऱ्यांनी हलक्या, मुरमाड जमिनी लवकर सुकल्याने बियाणे टाकले होते. आता लागवडीसाठी रोपे तयार झाली आहेत. यावर्षी सुरुवातीला अल्प पावसामुळे लाल कांद्याची लागवड उशिरा झाली. त्यामुळे लाल कांदा मार्केटमध्ये येण्यास उशीर झाला.
उत्पादनामध्ये घट
काही प्रमाणात काढणीसाठी आलेल्या लाल पोळ कांद्याचे क्षेत्र लागवड केले आहे. त्या क्षेत्रात दरवर्षी पाच ते सहा ट्रॅक्टर कांदा निघत होता. त्या जागेवर आता फक्त दोन ते तीन ट्रॅक्टर निघत आहे. त्यालाही कमी भाव मिळू लागला आहे. परंतु, तो मागील वर्षीच्या तुलनेत फार कमी निघत आहे. त्यामुळे लाल कांद्यावर झालेला खर्चसुद्धा निघत नाही. ज्या शेतकऱ्यांनी आठ हजार रुपये पायलीप्रमाणे बियाणे विकत घेऊन टाकली आहेत. त्याची किमत आज तब्बल 25 ते 30 हजार रुपयांवर गेली आहे. परंतु, तो देखील मिळत नसल्याचे चित्र आहे. एका वाफ्याची किंमत दोन ते तीन हजार रुपये आहे. एक कॅरेट कांद्याच्या रोपाची किमत हजार ते पंधराशे रुपये असून यावर परतावा काय मिळणार याची शंका आहे.