पुणे : लोकमत आयोजित लोकमत सरपंच अवॉर्ड्सचे वितरण आज पुणे येथे पार पडत आहे. या कार्यक्रमामध्ये पुणे जिल्ह्यातील अनेक सरपंचांनी सहभाग घेतला असून यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या एकूण १३ सरपंचांचा सन्मान केला जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील या पुरस्कारासाठी अनेक सरपंचांनी नाव नोंदणी केली होती.
दरम्यान, महाराष्ट्रामध्ये साधारण ४० हजार गावे आहेत. तर या गावांचा विकास करण्यासाठी आणि गावाला राज्यस्तरीय पटलावर ठेवण्यासाठी संरपंचांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे अशा सरपंचांचा सन्मान व्हावा या उद्देशाने लोकमतने लोकमत सरपंच अवॉर्ड्स कार्यक्रम आयोजित केला आहे. तर आज हा कार्यक्रम पुणे शहरातील बाणेर रोडवरील यशवंतराव चव्हाण प्रबोधिनी (यशदा) येथे पार पडत आहेत.
पुणे जिल्ह्यातील १हजार ३८५ सरपंचामधून १३ सरपंचांची 'लोकमत सरपंच अवॉर्ड्स'साठी निवड केली गेली आहे. यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, शेती, उद्योग, मुलभूत सुविधा, सांस्कृतीक या क्षेत्रात उल्लेखनीय आणि विशेष काम केलेल्या सरपंचांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील, लोकमत पुणेचे संपादक संजय आवटे, वनराईचे रविंद्र धारिया, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि सामाजिक कार्यकर्ते भीम रासकर हे उपस्थित होते.