राज्यात यंदाचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यात यंदा २०७ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता. त्यातील आतापर्यंत १७८ कारखान्यांनी गाळप बंद केले असून, अजूनही २९ कारखाने सुरू आहेत.
राज्यात आतापर्यंत १०८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात सुमारे तीन लाख टन साखर उत्पादन जादा आहे. साखरेच्या सरासरी उताऱ्यात पाव टक्क्याने झालेली वाढ, तसेच इथेनॉल निर्मितीकडू वळविण्यात आलेल्या साखरेमुळे एकूण उत्पादनात वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कोल्हापूर विभागात सध्या एकच कारखाना सुरू असून, पुणे विभागातील पाच कारखाने अद्याप सुरू आहेत. यंदा पर्जन्यमान कमी झाल्यामुळे ऊस उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन साखर उत्पादनदेखील कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
साखर हंगामाच्या सुरुवातीला राज्यात केवळ ८८ लाख टन निव्वळ साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे ऊस पिकाला फायदा होऊन त्याचा परिणाम ऊस उत्पादन वाढीत झाला.
त्याचप्रमाणे केंद्र सरकारने इथेनॉलनिर्मितीवर बंदी घातल्याने त्याकडे वळवली जाणारी साखर कमी झाली. परिणामी, एकूण साखर उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
२९ कारखाने अद्याप सुरू
■ राज्यात यंदा १०३ सहकारी व १०४ खासगी कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम सुरू केला होता. राज्यात ७ एप्रिलअखेर या २०७ कारखान्यांनी मिळून १ हजार ५९ लाख टन उसाचे गाळप केले असून, आतापर्यंत १०८.४ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे.
■ राज्यात सरासरी साखर उतारा १०.२४ टक्के इतका आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत साखर उतारा पाव टक्क्याने वाढल्याने एकूण साखर उत्पादनात सुमारे तीन लाख टन वाढ झाली आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत १०५ लाख टन साखर उत्पादन झाले होते.
■ गेल्या वर्षीच्या हंगामाचा तुलनात्मक अभ्यास केला असता आजअखेर सर्व २११ कारखाने बंद झाले होते. मात्र, यंदा २०७ कारखान्यांपैकी १७८ कारखाने बंद झाले असून, अद्यापही २९ कारखाने सुरू आहेत.
■ कोल्हापूर विभागात १ तर पुणे विभागातील ५ कारखाने सुरू आहेत. सोलापूर ५, नगर ९ संभाजीनगर ३, नांदेड ४ व नागपूर विभागातील २ कारखाने अद्यापही सुरू आहेत.