भारतातील एकूण भात लागवडीपैकी जवळ जवळ ३५ टक्के क्षेत्र हे महाराष्ट्र राज्यात आहे तसेच एकूण तृणधान्य उत्पादनापैकी ३५ टक्के उत्पादन हे महाराष्ट्र राज्यात आहे. भात पिकावर महत्वाची किड म्हणजे खोडकिडा, लष्करी अळी, पाने गुंडाळणारी अळी, सुरळीतील अळी, तुडतुडे, भुंगेरे, लोंबीतील ढेकण्या इ. किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो तसेच महत्वाचे रोग म्हणजे करपा, पर्णकुजवा, पर्णकरपा, पर्ण कोष कुजव्या, दाणे रंगहिनता, कडाकरपा, आभासमय काजळी काळजी इ. आहेत. भात पिकाच्या कापणीनंतर उन्हाळ्यात नांगरट करून काडीकचरा, धसकटे गोळा करून नाश करावीत जेणेकरून किडीच्या व रोगांच्या नियंत्रणात मदत होईल.
किड व्यवस्थापन१) किड प्रतिकारक वाणांची लागवड करावी. भात शेतात परभक्षी किटकांचे संवर्धन करावे.२) तपकिरी तुडतुडे, खोडकिडीसाठी इमिडाक्लोप्रीड १७.८ एस.एल. १२५ मिली किंवा फिप्रोनिल ५% एस.सी. १५०० मिली प्रति ५०० लिटर पाण्यात हेक्टरी फवारणी करावी.३) पाने गुंडाळणारी अळी, खोडकिडा, तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क ५ टक्के २५० मिली किंवा अॅसेफेट ७५ टक्के एस.पी ६०० ग्रॅम प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.४) लष्करी अळी व लोंबीतील ढेकण्याच्या नियंत्रणासाठी मिथील पॅराथिऑन २ टक्के भुकटी प्रति हेक्टरी २५ किलो धुरळणी करावी. ५. खोडकिडीच्या जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा जापोनिकम या प्रजातीचे १ लक्ष प्रौढ प्रति हेक्टरी आठवडयाच्या अंतराने पीक लागणीनंतर एक महिन्यांनी चार वेळा प्रसारित करावीत.६) पाने गुंडाळणाऱ्या अळीसाठी ट्रायकोग्रामा चिलेनिस या प्रजातीचे एक लक्ष प्रौढ प्रति हेक्टर आठवडयाच्या अंतराने वरील प्रमाणे चार वेळा प्रसारीत करावेत.७) खाचरात खेकडयांच्या बंदोबस्तासाठी हंगामाचे सुरवातीला विषारी अभिष वापरावे. त्यासाठी कार्बारील ५० टक्के डब्ल्यु. पी. ५० ग्रॅम किंवा अॅसिफेट ७५ टक्के एस.पी. ७५ ग्रॅम हे १ किलो शिजवलेल्या भातामध्ये मिसळून गोळ्या तयार करून खेकड्यांच्या बिळामध्ये टाकाव्यात व बिळे बंद करावीत.८) उंदराच्या नियंत्रणासाठी शेताची खोल नांगरट करून बांधाची छटाई करावी व जुनी बिळे नष्ट करावीत. या बरोबरच १० ग्रॅम झिक फॉस्फाईड २.५. टक्के १० मिली खाद्यतेलात मिसळून ३८० ग्रॅम भरड धान्यात एकत्रित करून गोळ्या कराव्यात व त्या विषारी अमिष म्हणून वापराव्यात.
रोग व्यवस्थापनरोग नियंत्रणासाठी रासायनिक खतांचा वापर शिफारशीत मात्रेप्रमाणेच करावा. नत्रयुक्त खते प्रमाणापेक्षा जास्त टाकू नयेत. अन्यथा करपा रोगाचे प्रमाण वाढते. खाचरात पाणी साचू न देता ते वाहते ठेवावे. रोग दिसताच पुढीलप्रमाणे बुरशीनाशकांच्या फवारण्या २ ते ३ आवश्यकतेनुसार १० ते १५ दिवसाच्या अंतराने कराव्यात तसेच द्रावणात स्टीकर १० मिली टाकून कराव्यात.
१) कडा करपा सोडून इतर रोगांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्झीक्लोराईड ५०% हेक्टरी १२५० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम ५० % हेक्टरी ५०० ग्रॅम प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यातून फवारावे.२) करपा आणि पर्णकोष कुजव्या रोगांच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम ५०% डब्ल्यु पी. ६.५ ग्रॅम किंवा हेक्साकोनाझोल ५ टक्के इ.सी. २० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.३) तपकिरी ठिपके रोगाच्या नियंत्रणासाठी प्रोपिनेद ७०% डब्ल्यु पी. ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.४) करपा, पर्ण कोष करणा आणि दाणे रंगहिनता या रोगांच्या नियंत्रणासाठी टेब्यूकोनॅझोल ५०% ट्रायफ्लॅक्झिसट्रोबिन कॉपर हायड्रॉक्साईड ५३.८% डी.एफ. ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून वापरावे.५) कडा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड ५० डब्ल्यु पी. २५ ग्रॅम अधिक स्ट्रिप्टोसायक्लीन १.५ ग्रॅम अधिक स्टीकर १० मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात रोग दिसताच फवारावे.६) आभासमय काजळी आणि उदबत्ता रोगग्रस्त लोंब्या काढून त्यांचा नाश करावा. परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी रोगनियंत्रण एकत्रितपणे करावे.
कृषि कीटकशास्त्र विभागकृषि विज्ञान केंद्र, नारायणगाव