Join us

अभिमानास्पद! ICRISATच्या महासंचालकपदी पहिल्यांदाच भारतीय वंशाचे डॉ. हिमांशु पाठक यांची निवड! 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 1:34 PM

या पदापर्यंत पोहचणारे डॉ. पाठक हे जागतिक CGIAR प्रणालीमध्ये संशोधन संस्थेचे नेतृत्व करण्यासाठी पहिले भारतीय आणि डॉ. एम.एस. स्वामिनाथन नंतर भारतीय वंशाचे दुसरे व्यक्ती आहेत.

कृषी संशोधन आणि शिक्षण (DARE) विभागाचे सचिव आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) महासंचालक डॉ. हिमांशू पाठक यांची इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी-एरिड ट्रॉपिक्स (इक्रीसॅट) च्या नवीन महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

या पदापर्यंत पोहचणारे डॉ. पाठक हे जागतिक CGIAR प्रणालीमध्ये संशोधन संस्थेचे नेतृत्व करण्यासाठी पहिले भारतीय आणि डॉ. एम.एस. स्वामिनाथन नंतर भारतीय वंशाचे दुसरे व्यक्ती आहेत. डॉ. स्वामीनाथन हे १९८२ ते १९८८ या काळात फिलीपिन्समधील CGIAR तांदूळ संशोधन प्रयोगशाळेच्या आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचे (IRRI) महासंचालक होते.

डॉ. हिमांशू पाठक हे कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव (DARE) आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) महासंचालक म्हणून कार्यरत होते. ते यापूर्वी भारतातील कटक येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्राचे संचालक होते. पुण्यातील बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था येथे संचालकपदाचा पदभार सांभाळला. त्याननंतर ते दिल्ली ICAR ला महासंचालकपदावर रूजू झाले.

पाठक यांनी नवी दिल्लीच्या भारतीय कृषी संशोधन संस्थेतून मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्रात पीएचडी केली आहे. त्यानंतर भारतीय कृषी संशोधन संस्थेतून मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्रात एमएससी पूर्ण केले. त्याबरोबरच बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांनी कृषी विषयात बीएससीचे शिक्षणही पूर्ण केलेले आहे. आपल्या कारकि‍र्दीत त्यांनी अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

काय आहे ICRISAT?अर्ध-शुष्क उष्ण कटिबंधांसाठी आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्था (The International Crops Research Institute for the Semi-Arid Tropics) म्हणजेच ICRISAT होय. ही जागतिक पातळीवर कोरडवाहू शेती आणि अन्नप्रणाली सुधारण्याच्या दृष्टीने काम करते. आशिया आणि आफ्रिका खंडातील प्रदेशांमधील लोकांचे कुपोषण, दारिद्र्य, भूक आणि पर्यावरणीय ऱ्हास यांचा सामना करणे हे या संस्थेचे ध्येय आहे. ही संस्था आंतरराष्ट्रीय गव्हर्निंग बोर्डाच्या मार्गदर्शनाखाली काम करते.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपीक