विदर्भातील शेतकऱ्यांना रोगमुक्त, गुणवत्तापूर्ण व उत्पादकता असलेल्या संत्र्याची गरज आहे, पण ती पूर्ण होत नाही. 'सीसीआरआय'सारखी संस्था ३०-३२ वर्षांपासून या भागात संशोधन करत आहे. मात्र, त्याचा शेतकऱ्यांना उपयोगच होत नसेल तर होणारे संशोधन व संशोधन संस्थांचा फायदा काय? असा परखड सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थित केला.
अधिक वाचा: संत्रा, माेसंबी उत्पादनात भारत जगात तिसरा पण लिंबूवर्गीय कलमांचा तुटवडा
इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर, भारतीय कृषी संशोधन परिषद आणि केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या 'एशियन सीट्स काँग्रेस २०२३ ला शनिवारपासून नागपुरात सुरुवात झाली. यावेळी गडकरी बोलत होते.
दोन कोटी कलमे उपलब्ध करा
भारतात लिंबूवर्गीय फळांच्या १.७० कोटी कलमांची गरज आहे. पण केवळ संशोधन संस्थांकडून खासगी नर्सरीच्या सहकार्याने केवळ २५ ते ३० लाख कलमे उपलब्ध होतात. याबाबत 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित केले होते. याचा उल्लेख करत नितीन गडकरी यांनी देशातील कृषी संशोधन संस्थांनी खासगी नर्सरीसोबत भागीदारी करून वर्षात २ कोटी कलमे उपलब्ध करावीत, असे आवाहन केले.