शिरीष शिंदे
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून शेतकऱ्यांना विविध बाबींचा लाभ देण्यासाठी ६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड येथे कृषी महोत्सवात बुधवारी सांगितले; परंतु पोकरा-२ सुरू कधी होणार, हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.
मागील दोन महिन्यांपासून पोकरा योजनेचे काम थांबले आहे. योजना सुरु होण्याची वाट शेतकऱ्यांसह तत्कालीन कर्मचारी पाहत आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा योजना २०१८ मध्ये सुरू करण्यात आली होती.
सात वर्षांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. अधिक अनुदान असल्याने अनेक शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग घेतला होता. पोकरा योजनेच्या कामांची अंमलबजावणी करण्यासाठी बीड़ शहरातील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातून पोकरा योजनेचे कामकाज केले जात होते.
पोकरा योजना अंमलबजावणीसाठी चार कर्मचारी नियुक्त केले होते. योजनेचा पहिला टप्पा संपण्यापूर्वी, ज्या शेतकऱ्यांना घटक मंजूर त्यांनी वेळेत कामे सुरू नाही केली तर त्यांची मंजुरी रद्द केली होती. त्याचे एसएमएस सुद्धा शेतकऱ्यांना पाठविले होते.
पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसरा टप्पा सुरू होणार असल्याची चर्चा होती; परंतु हा प्रकल्प कधी सुरू होईल, याबाबत शासनाकडून कोणत्याही सूचना आल्या नाहीत.
परिणामी, योजनेसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती संपुष्टात आली. सध्या या योजनेचे कामकाज बंद आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे काम थांबले आहे त्यांचे पोकरा-२ कडे लक्ष लागले आहे. दुसरा टप्पा सुरू होईल व पुन्हा काम मिळेल, या आशेवर कर्मचारी आहेत.
नवीन गावांचा होणार समावेश
■ २०१८ पासून बीड जिल्ह्यात पोकरा योजनेला सुरुवात झाली, पहिल्या टप्प्यात पोकरा योजनेसाठी बीड जिल्ह्यातील ३९० गावांची निवड केली होती.
■ या गावांची निवड करून प्रकल्प आराखडे तयार करून त्यास प्रकल्प यंत्रणा व कृषी विभागास पाठविण्यात आले होते.
■ पोकरा योजना प्रकल्पामधून वैयक्तिक लाभ, मृद व जलसंधारणाची कामे व शेतकरी उत्पादक कंपनी, गटांच्या व्यावसायिक प्रस्तावास अर्थ साहाय्य देण्यात आले होते.
■ आता पोकरा-२ साठी पूर्वीची गावे वगळता नवीन गावांचा समावेश केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
केंद्रीय अर्थ व नियोजन खात्यास गेला प्रस्ताव
पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात वातावरणातील बदलाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यात यश आले आहे.
आता दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्प मंजुरीचा प्रस्ताव प्रकल्प संचालकांनी केंद्रीय अर्थ आणि नियोजन खात्यास डिसेंबर २०२३ मध्ये पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोकरा-२ मध्ये जिल्ह्याची संख्या वाढविण्याबाबत विचार सुरू आहे. प्रकल्प संचालकांनी पाठविलेल्या अहवालास मंजुरी प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी महोत्सवात पोकरासाठी शेतकऱ्यांना विविध बाबींचा लाभ देण्यासाठी ६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे सांगितले. त्यामुळे पोकरा-२ लवकरच सुरू होईल, अशी शक्यता आहे.