पुणे : पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कर्नाटकातील काही पट्ट्यामध्ये खिल्लार गोवंशाचे पालन केले जाते. तर अनेक बैलगाडाप्रेमी बैलांना बैलगाडा शर्यतीसाठी आणि प्रदर्शनासाठी तयार करत असतात. त्याचप्रमाणे दौंड तालुक्यातील नंदादेवी येथील संतोष कोकणे या शेतकऱ्याने आपल्या बैलाला चक्क पप्पी घेण्याचं कसब शिकवलं आहे. बैलाला सांगितलं की तो चक्क व्यक्तीची पप्पी घेतो. सध्या या बैलाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.
दरम्यान, संतोष कोकणे हे दौंड तालुक्यातील नंदादेवी येथील तरूण शेतकरी असून त्यांना बैलगाडा शर्यतीचा नाद आहे. म्हणून त्यांनी सोन्या नावाच्या बैलाला सहा महिन्याचा असताना विकत घेतला होता. त्याचबरोबर त्यांनी सोन्या आणि मोन्या नावाच्या खिल्लार बैलांना पप्पी घ्यायला शिकवलं आहे. पाय पुढे घेणे, पाटावर उभं राहणे, पळायला सांगितल्यावर पळणे, प्रदर्शनासाठी परिक्षकांना हवं तसं उभं राहणे अशा गोष्टी या बैलांना शिकवल्या आहेत.
व्यायाम आणि प्रशिक्षण
या बैलांच्या व्यायामासाठी त्यांना रोज एक ते दीड किलोमीटर चालवले जाते. त्यानंतर त्यांना लिंबाचा पाला खाऊ घातला जातो आणि त्यावर उसाच्या कांड्याचा एक टफ दिला जातो. त्याचबरोबर सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास त्याला प्रदर्शनासाठीचे प्रशिक्षण दिले जाते. बैलांना आपण केलेल्या खाणाखुणा कळतात यामुळे तो पप्पी घेणे, पाटावर उभे राहणे अशा गोष्टी करतो.
खुराक
उसाची कांडी किंवा उसाचा रस कॅल्शिअमसाठी चांगला असतो. त्याचबरोबर लिंबाचा पाला खाल्ल्याने तोंड कडू पडते म्हणून ते शरिरासाठी चांगले असते असं कोकणे सांगतात. यानंतर त्यांना खुराक आणि खाद्यामध्ये मका, नेपिअर, मेथी घास, शेंगदाणा पेंड, मकाचा भरडा, उडीद, गाजर, पीठ अशा गोष्टींचा सामावेश असतो असं ते सांगतात.
https://www.instagram.com/reel/C2RwkizNjwf/
लाखोंची मागणी
या बैलांना प्रदर्शनासाठी उतरवत असल्याने त्याला लाखोंमध्ये बोली लागली आहे पण कोकणे यांना ही बैलजोड विकायची नाही. बारामती येथे झालेल्या कृषी प्रदर्शनामध्ये हा बैल चांगलाच व्हायरल झाला होता त्यामुळे या बैलाला ५० लाखांची मागणी झाली आहे. याआधी ४० लाखांपर्यंत मागणी झाली होती पण ते आमच्या घरातल्या सदस्यांसारखे असल्यामुळे आम्ही त्यांना विकणार नाही असं ते सांगतात.
एका व्यक्तीला आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी आमच्या सोन्या मोन्या बैलजोड विकत घेण्यासाठी आला होता. तेव्हा या बैलाचा सौदा चालू असताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यावेळी मी हा सौदा रद्द केला आणि त्याच्या डोळ्यातील पाणी पुसून त्यांना खायला दिलं. या बैलांना आम्ही घरातल्या सदस्यांसारखं वागवतो.
- संतोष कोकणे, बैलपालक शेतकरी