Join us

Pune : पावसामुळे पुरंदरच्या सिताफळ उत्पादकांना फटका! दरही कमी, निर्यातीवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 8:42 PM

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील अंजीर आणि सिताफळ हे फळपिके प्रसिद्ध आहेत. पावसामुळे येथील सिताफळावरील चमक गेली आहे. त्यामुळे बाजारात या सिताफळाला योग्य दर मिळत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

Pune : राज्यात यंदा परतीच्या आणि मान्सनोत्तर पावसाने चांगलीच हजेरी लावली. दरम्यान, परतीच्या पावसानंतरच्या पावसाने पिकांना झोडपले आहे. या पावसामुळे कांदा, कापूस, सोयाबीन, मका या पिकांचे मोठे नुकसान झाले असून ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. त्याबरोबरच राज्यातील फळपिकांनाही या पावसाचा फटका बसला आहे. त्यामध्ये द्राक्ष, डाळिंब, पेरू, सिताफळ, कलिंगडाचा सामावेश आहे. 

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील अंजीर आणि सिताफळ हे फळपिके प्रसिद्ध आहेत. पावसामुळे येथील सिताफळावरील चमक गेली आहे. त्यामुळे बाजारात या सिताफळाला योग्य दर मिळत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. तर मान्सूनोत्तर पावसामुळे सिताफळाच्या झाडावरील सर्व पाला गळून पडला आणि सिताफळाला पावसाचा थेट मारा बसला. यामुळे सिताफळावरील नैसर्गिक चकाकी गेली आणि फळे काळे पडल्याचं प्रगतशील सिताफळ उत्पादक शेतकरी समील इंगळे यांनी सांगितले. 

दरम्यान, पावसातील खंड, अचानक पडलेला पाऊस अन् बदलत्या वातावरणाचाही सिताफळाच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. बाजारातील वाढलेली आवक, फळांची ढासळलेली गुणवत्ता यामुळे बाजारातील दरही कोसळले. तर येथील शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे सिताफळाची निर्यात केली जात असून त्यावरही यामुळे परिणाम झाला आहे. मागणी आणि ऑर्डर असूनही फ्रेश सिताफळाची निर्यात थांबवावी लागल्याची माहिती येथील पुरंदर हायलँड्स शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रोहन उरसळ यांनी सांगितली.

जास्त पाऊस झाल्यामुळे पाठीमागचा माल त्या क्वालिटीचा राहिला नाही. सिताफळाचा माल जूनपासूनच सुरू झाला होता. पण आता शेवटच्या टप्प्यामध्ये झाडावर माल कमी राहिला आहे. पावसामुळे झाडावर पाने राहिली नाहीत, त्यामुळे फिनिशिंग राहिली नाही, पावसाने झोडपल्यामुळे काही सिताफळ काळे पडले. तेज राहिले नाही.- समील इंगळे (सिताफळ उत्पादक शेतकरी)          

गणेशोत्सव आणि पितृपक्षात अचानक पाऊस उघडला आणि वातावरणात बदल झाले. खंडानंतर अचानक पाऊस झाल्यामुळे कमी कालावधीमध्ये सिताफळ तयार झाली, त्यामुळे बरेचसे क्रॅकिंगही झाले. या कारणामुळे बाजारात आवक वाढली आणि शेतकऱ्यांना कमी दर मिळाला. सध्या पुरंदर तालुक्यातील सिताफळाचा हंगाम संपत आला आहे. दरवर्षी दिवाळीनंतर हा हंगाम चालू असतो पण यंदा दिवाळीच्या आधीच ९० टक्के सिताफळ संपले आहेत. - प्रदिप दळवे (प्रभारी अधिकारी, अंजीर व सिताफळ संशोधन केंद्र, जाधववाडी, ता. पुरंदर) 

टॅग्स :शेती क्षेत्रपुणेपुरंदरशेतकरी