Pune : पुण्यातील कृषी महाविद्यालयाने भारतातील पहिलेच रासायनिक अवशेषमुक्त शेती प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यामध्ये पुणेकरांना आणि शेतकऱ्यांना रेसिड्यू फ्री शेतीचे आणि रेसिड्यू फ्री अन्नाचे महत्त्व सांगण्यात येणार आहे. हे प्रदर्शन पुणेकरांना ६ मार्च ते १० मार्च यादरम्यान पाहायला मिळणार आहे.
विशेष म्हणजे हे प्रदर्शन पुणेकरांसाठी पूर्णपणे फ्री असून सकाळी ९ ते सायंकाळी ९ च्या दरम्यान प्रवेश करता येणार आहे. शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी ही एक पर्वणी असणार असून यामध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान आणि शेतीमधील वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळणार आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन, प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान, अनुभवी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन, वेगवेगळ्या शेतीपद्धतीचे डेमो, गांडूळ खत - कंपोस्ट खताचे डेमो दाखवण्यात येणार आहेत.
प्रदर्शनीची प्रमुख उद्यिष्टेः
१. शेतकऱ्यांना आणि सामान्य जनतेला कृषिच्या महत्वाबद्दल जाणीव करून देणे
२. शेतकऱ्यांना सहकार्य, प्रोत्साहन देणे, शेतकरी, कृषि शास्त्रज्ञ, सहकारी संस्था आणि उद्योग प्रमुख यांच्यात स्पर्धायुक्त सहकार्य व मैत्रीपुर्ण वातावरण निर्माण करणे.
३. शेतकऱ्यांना सशक्त बनवणे, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर शाश्वत कृषी पध्दती लागू करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान प्रदान करणे.
४. विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये तसेच उद्योजकता विकास करण्यासाठी विविध प्रशिक्षणे आयोजित करणे. विद्यार्थ्यांना विविध उद्योगांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देणे