पुणे : मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून आज पुण्याला पावसाने अक्षरशः झोडपले आहे. आज दुपारनंतर पुण्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. तर घाट परिसरातील शेतकऱ्यांना भाताचे रोप टाकण्यासाठी चांगली सोय झाली आहे.
दरम्यान, आज मागच्या तीन ते चार दिवसांपासून पुण्यात पावसाचे वातावरण असून पाराही कमी झाला आहे. तर आज दुपारी ४ वाजता सुरू झालेला पाऊस रात्रीपर्यंत सुरू होता. पुणे शहर आणि उपनगर भागांत पावसाने चांगलेच झोडपले असून यामुळे रस्त्यावर पाणी आले आहे.
कंबरेएवढे साचले पाणी
अचानक आलेल्या पावसामुळे पुण्यातील रस्त्यावर पाणी आले असून वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. पावसाच्या पाण्यामुळे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांची धांदल उडाली आहे. अनेक भागांत कंबरेएवढे पाणी साचल्यामुळे नागरिकांना पायीसुद्धा चालता येत नव्हते.
शेतकऱ्यांना फायदा
मान्सूनचा पाऊस राज्यभर पडण्यास सुरूवात झाली असून शेतकऱ्यांना या पावसाचा फायदा होणार आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या घाट परिसरात भातशेतीसाठी या पावसाचा फायदा होत आहे.