- चंद्रकांत औटी
राजुरी : तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी, उंचखडक, बेल्हे, आणे भागात यंदा कधी नव्हे तो रब्बी हंगामातील पीक पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल पहावयास मिळत आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना महत्त्व न देता ज्यामधून अधिकचे उत्पन्न मिळेल अशा कांदा, ऊस, फ्लॉवर याकडे लक्ष दिले आहे.
यामुळे रब्बी हंगामातील पिकांकडे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत चालूवर्षी गहू, हरभरा, ज्वारीची खूपच कमी लागवड झालेली आहे. त्यामुळे कांदा, ऊस जोमात, हरभरा, गव्हाकडे शेतकऱ्यांचे होतेय दुर्लक्ष अशी अवस्था सध्या जुन्नरच्या पूर्व भागात निर्माण झाली आहे.
पावसामुळे लांबलेल्या पेरण्या आणि पाण्याची उपलब्धता यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, हरभरा पिकाकडे दुर्लक्ष करीत कांदा, ऊस, फ्लॉवर, टोमॅटो अशा पिकांवरच भर दिलेला दिसत आहे.
उत्पादनाच्या दृष्टीने खरीप हंगामच महत्त्वाचा मानला जातो. पण यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. खरिपात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक पद्धतीमध्येच बदल केला आहे. चालू वर्षी विभागात यंदा सरासरी क्षेत्राच्या तुलनेत कमी पेरा झाला आहे.
पावसाच्या अनियमिततेचा फटका
पावसाच्या अनियमिततेचा खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामालाही फटका बसला आहे. पाऊसच कभी असल्याने यंदा शेतकऱ्यांचा कांदा, उसाकडे कल आहे. त्यामुळे ज्वारीसह हरभरा, गहू आदी पिकांचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे उडीद, मूग, सोयाबीन आदी पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली. काही ठिकाणी न तर पाऊस नसल्याने पेरणीच झाली नाही. पिकांची उगवण झालेल्या ठिकाणी नंतर पावसाने ओढ दिली. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे.
रब्बी हंगामातील पिकांची स्थिती
तालुक्यातील पूर्व पट्ट्यात ज्वारी, गहू, हरभरा हेच रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे. मात्र, यंदा पेरणी क्षेत्रात मोठी घट झाली आहे. ज्वारीला मिळणारा दर आणि पेरणीपासून काढणीपर्यंतचे कष्ट यामुळे शेतकरी या मुख्य पिकाकडे पाठ फिरवत आहेत. तसेच ज्वारी हे दाणे पक्चतेच्या अवस्थेत असतानाच अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढतो. मका पिकांवरदेखील अळीचा प्रादुर्भाव होतोय. यामुळेच खर्चात वाढ होऊन उत्पादनावर परिणाम होत आहे.
ऊस हे नगदी पीक असून त्याला हमीभाव भेटतो. कांदा पिकाला बाजारभाव मिळाल्यास दोन रुपये शेतकऱ्याला मिळतात. गहू, हरभरा पिकांना फवारणी खर्च जास्त येतो. तसेच खुरपणी तसेच इतर मजुरी जास्त लागते.
- संदीप मते, शेतकरी