Join us

पुण्यात हापूसच्या नावाने फसवणूक! रत्नागिरी-देवगडच्या नावाने घेतलेला हापूस कर्नाटकचा तर नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2024 8:24 PM

पुणे मार्केटयार्डात ग्राहकांची फसवणूक : पणन संचालकांनी परिपत्रक काढून ही बाजार समितीचे दुर्लक्ष

पुणे: पुणेबाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात रविवारी गुढीपाडव्यानिमित्त आंब्यांची मोठया प्रमाणात आवक झाली होती. जवळपास १२ ते १४ हजार पेट्टीची आवक झाली आहे. त्यात रत्नागिरी आणि देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंब्याची विक्री केली जात आहे. काही आडत्यांकडून रत्नागिरी आणि देवगड हापूसच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केली जात असताना मात्र बाजार समितीचे याकडे दुर्लक्ष आहे.

अप्रतिम गोडीमुळे खव्वय्ये कोकणातील हापूसच्या हंगामाची वाट पाहत असतात. हंगाम बहरात आल्यामुळे सध्या गुलटेकडी मार्केटयार्ड फळबाजारात मोठ्या प्रमाणात कोकणासह परराज्यातील आंब्याची आवक होत आहे. काही आडतदार रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटक आंब्याची विक्री करत आहे. त्यामुळे नागरिकांची फसवणूक होत आहे.

या फसवणुकीस आळा बसण्यासाठी तत्कालीन पणन संचालकांनी परिपत्रक काढत अशा फसवणूक करणाऱ्या आडत्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश राज्यातील सर्व बाजार समित्यांना देऊन सुमारे चार वर्षे होत आले. मात्र, मार्केटयार्डमध्ये राजरोसपणे कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेशातील आंब्यांची देवगड, रत्नागिरी हापूसच्या बॉक्समध्ये भरून विक्री केली जात आहे. याकडे दुर्लक्ष होत आहे.

विभागप्रमुख, गटप्रमुखांचा कानाडोळामार्केटयार्डात आंब्याच्या हंगामात प्रत्यक्ष झालेली आवक आणि कागदावर आवक यात मोठी तफावत असते. ग्राहकांची फसवणूक करणारे बहुतांश आडतदार हे परराज्यातील आंबा विक्री करतात. मात्र, आंबा हंगामात आडते आणि विभागप्रमुख, गटप्रमुखांच्या साटेलोट्यामुळे कारवाई केली जात नाही. परिणामी नागरिकांची फसवणूक होते. या प्रकारामुळे भविष्यात मार्केटयार्डातून नागरिक आंबा खरेदी करण्यासह आवकेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे आडत्यांनी ग्राहकांची फसवणूक करू नये. जो आंबा आहे त्याच राज्यांचा आंबा नावाने विक्री करावी .

ग्राहकांची फसवणूक होवू नये यासाठी ३ अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. यापुढे रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटक आंब्याची विक्री केली तर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे आणि परवाना रद्दही करण्याचे आदेश काढले आहेत. ग्राहकांनी ही चौकशी करूनच खरेदी करावी.- डॉ. राजाराम धोंडकर (सचिव, कृषि उत्पन्न बाजार समिती)

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारपुणे