Pune : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत दरवर्षी 'उत्पादक ते ग्राहक थेट विक्री' या संकल्पने अंतर्गत विविध महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. विक्री व्यवस्वेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा या उद्देशाने विविध फळ व धान्य महोत्सवांचे आयोजन करण्यात येते. त्याप्रमाणे पुण्यात मिलेट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. पुणेकरांना यानिमित्ताने मिलेटपासून म्हणजेच भरडधान्यांपासून बनवलेल्या पदार्थांची खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष' म्हणून साजरे केले. या निमित्ताने देशभर विविध उपक्रम राबविण्यात आले. तृणधान्यांमध्ये असलेल्या पोषक तत्वामुळे सामान्य ग्राहक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. त्यामुळे भलेही तृणधान्य वर्षाची सांगता झालेली असली तरी, उत्पादक तसेच ग्राहकांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून फायदेशीर आहे. या भूमिकेतून गतवर्षी मिलेट महोत्सवाची सुरूवात करण्यात आली व त्याला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला.
यामुळे चालूवर्षीही मिलेट (तृणधान्य) महोत्सवाचे पुण्यामध्ये आयोजन करण्याच्या सुचना मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पुण्यातील स्वारगेटजवळील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे मिलेट (तृणधान्य) महोत्सव-२०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ८ ते १२ जानेवारी, २०२५ या कालावधीत करण्यात येणार असुन मिलेट व मिलेटची उत्पादने, त्यामध्ये कार्यरत असणाऱ्या शेतकरी उत्पादक संस्था, स्टार्टअपस यांच्यासोबत थेट संवाद साधण्यासाठी मंत्री रावल ९ जानेवारी रोजी महोत्सवास भेट देणार आहेत.
महोत्सवामध्ये राज्याच्या विविध भागातून तृणधान्य उत्पादक, प्रक्रियामध्ये कार्यरत असणारे बचत गट. सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टर्ट कंपन्या सहभागी होणार आहेत. या ठिकाणी उत्पादकांना सुमारे ५० स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार असुन ग्राहकांना अस्सल ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा, सामा, कोद्रा हि तृणधान्ये व यापासुन तयार करण्यात येणारा ज्वारीचा रवा, बाजरीच्या लाह्या, रागीची बिस्किटे, ज्वारीचे इडली- मिक्स, रागीचा डोसा मिक्स, ज्वारीचे आईसक्रिम इत्यादी नाविण्यपुर्ण अशी उत्पादने थेट उत्पादकांकडून प्रदर्शन तसेच विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. या वर्षी पणन मंडळाच्या नागपूर विभागाने काही संत्रा उत्पादकांना संत्री विक्रीची संधी देणेबाबत विनंती केल्याने काही संत्रा उत्पादकही सहभागी होणार आहेत.
याबरोबरच मिलेट उत्पादन, मुल्यवर्धीत प्रक्रिया उत्पादने, आरोग्यविषयक महत्व विषयी नामांकित तज्ञांची मार्गदर्शनासाठी उपस्थिती, खरेदीदार-विक्रेते संमेलन, मिलेटपासून बनविण्यात येणा-या उत्पादनांची प्रात्यक्षिके अशी विविध कार्यक्रमांचे आयोजन या कालावधीत असणार आहे. त्यामुळे पुण्यातील ग्राहकांनी मिलेट खरेदी, विविध कार्यक्रमाचा लाभ घेण्याबरोबरच नववर्षाची सुरूवात आरोग्यपुर्ण अशा मिलेटने करावी असे आवाहन पणन मंडळामार्फत करण्यात आले आहे.