Join us

माय उसतोडीसाठी पुण्यात, लेकरू पोटासाठी गडचिरोलीत; मायलेकरांची अशीही ताटातूट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 3:03 PM

पुणे परिसरातील बाराही महिने सुरू असलेल्या गुऱ्हाळांसाठी काम करत असलेल्या उसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न चव्हाट्यावर आले आहेत.

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड, पाटस, यवत या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर बारमाही गुऱ्हाळ चालू असतात. तिनही ऋतूमध्ये सुरू असलेल्या गुऱ्हाळासाठी आडसाली ऊस वापरला जातो. तर उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर कामगार येथे उसतोडीसाठी येत असतात. पण या कामगारांच्या व्यथा मनाला विचलीत करतात.

जळगाव, धुळे, मराठवाड्यातील अगदी उत्तरेकडून भागातून येथे मोठ्या प्रमाणावर कामगार आपल्या लहान लेकरांना घेऊन येतात. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचे आणि आरोग्याचे तीनतेरा वाजल्याचं पाहायला मिळतं. इथं उसतोडीसाठी येणाऱ्या प्रत्येक कामगाराचं हातावर पोट असल्याचं त्यांनी लोकमत अॅग्रोशी बोलताना सांगितलं. 

पोटासाठी मायलेकरांची ताटातूटया कामगारामध्ये एका महिलेला दोन मुले आहेत. त्यातील मुलीचे दहावीपर्यंत शिक्षण झाले असून तिचा विवाह झाला आहे. तर दुसरा मुलगा गडचिरोली येथे किराणा दुकान चालवतो असं तिने सांगितलं. ही महिला मुळची जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील असून ती उसतोडीसाठी पश्चिम महाराष्ट्रात आली आहे. पोटासाठी आमची ताटातूट झाल्याचं या महिलेने सांगितलं.

उसतोडीचे किती मिळतात पैसे?हे कामगार उसतोडीचे पाच महिने आणि गुऱ्हाळासाठी ३ महिने उसतोडी करतात. यामुळे वर्षातील ८ महिने त्यांना उसतोडी करावी लागते. या काळात त्यांना केवळ १ ते दीड लाख रूपये मिळतात. तर आत्तापासून थेट होळीपर्यंत घरी जाता येत नाही असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, साखर कारखाने आणि गुऱ्हाळासाठी उसतोड करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामगारांचे स्थलांतर होते. त्यामध्ये या कामगारांच्या राहण्याच्या सुविधेपासून इतर सर्व सुविधांची वाणवाच असते. साखर शाळासुद्धा व्यवस्थित चालत नसल्यामुळे कामगारांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी