अमरावती : कापूस खरेदीच्या व्यवहारात एका शेतकऱ्याची एक लाख ५६ हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. ही घटना भातकुली ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी भातकुली पोलिसांनी २५ जून रोजी सायंकाळी ७१ वर्षीय शेतकऱ्याच्या तक्रारीवरून एका दलालाविरुद्ध गुन्हा दाखल केला. दिलीप नरसिंह देशमुख (वय ६०, रा. कानफोडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गणोजादेवी येथील रहिवासी सुरेश अमृतराव मोहोड (७१) यांना २४ क्विंटल कापसाचे उत्पादन झाले होते. त्यांनीही दिलीप देशमुखमार्फत कापूस विकण्यासाठी त्याच्याशी संपर्क केला. त्यावर त्याने गावात गाडी पाठवून कापूस विकत घेऊन जातो, असे सांगितले. दरम्यान, २५ फेब्रुवारी रोजी दुपारी दिलीपने सुरेश यांना कॉल केला. मजुरासह गाडी पाठवत असल्याचे त्याने सांगितले. गाडीत माल भरून तुम्ही गणोजा देवी मार्गावरील जिनिंगमध्ये या, गाडीचा काटा करून व कापूस मोजून पैसे देतो, असेही तो म्हणाला.
त्यानुसार सुरेश हे दिलीपने पाठविलेल्या मजुरांसह गाडीत कापूस भरून जिनिंगमध्ये गेले. तेथे कापूस मोजल्यावर तो २३ क्विंटल ४० किलो भरला. त्याची १ लाख ५६ हजार रुपये किंमत होती. त्यावेळी दिलीपने नंतर पैसे देतो, असे सांगितल्यावर सुरेश हे घरी परतले. ते पैसे मिळण्याची वाट बघत होते. परंतु, बरेच दिवस लोटूनही दिलीपने पैसे दिले नाही. त्यामुळे सुरेश मोहोड यांनी त्याची भेट घेतली. मात्र, त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. अशात गावातील अन्य शेतकऱ्यांचाही कापूस खरेदी करून त्यांना दिलीपने पैसे न दिल्याचे सुरेश यांना समजले. त्यामुळे त्यांनी भातकुली ठाण्यात तक्रार दाखल केली.