Raan bhaji : पावसाळ्यात रानभाज्या खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. दिवसेंदिवस शेतातून रानभाज्या नामशेष होताना दिसतात. तरी ग्रामीण भागात आजही रानभाज्या मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.
रानभाज्या आरोग्यदायी असल्याने दररोजच्या आहारात रानभाज्या महत्त्वाच्या आहेत. चांगल्या आरोग्यासाठी रानभाज्यांचा रोजच्या आहारात सेवन करणे गरजेचे आहे.
निरोगी आणि आरोग्याला पोषक सर्व घटक मिळत असल्याने पालेभाज्यांचा दैनंदिन आहारात समावेश असावा. रानभाज्या खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते, शरीराला पोषक घटक मिळतात.
पोषक घटकयुक्त अंबाडी भाजी
अंबाडीच्या भाजीत कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, झिंक, जीवनसत्त्व "अ" "क" अशा पोषक घटकांसह मोठ्या प्रमाणात पौष्टीक घटक असतात. रानभाज्यांसह इतर पालेभाज्यांमध्ये खनिजांचा उत्तम स्रोत आहे. उत्तम प्रमाणात लोह आणि फॉलिक ॲसिडच्या उपलब्धतेमुळे रक्त्त वाढण्यास मदत होते. डोळे, केस, हाडांसाठी तसेच रक्त्तदाब नियंत्रणासाठी ही भाजी उपयुक्त आहे.
"सी" जीवनसत्त्व असलेली तांदुळजा भाजी
तांदुळजा ही एक गावाकडची लोकप्रिय अशी रानभाजी आहे. शरीराला "सी" जीवनसत्त्व मिळावे म्हणून तांदुळजाची भाजी खावी, असे सांगितले जाते. जर कोणाला गोवर, कांजण्या आल्या किंवा खूप ताप आला तर शरीरातील उष्णता कमी करावयास तांदुळजा उपयुक्त ठरते.
या रानभाज्या आरोग्यासाठी हितकारक
रानभाज्या आरोग्यासाठी हितकारक ठरतात. कटुले, फांदची भाजी, करंजी, अंबडचुका ह्या रान भाज्यासोबत पावसाळयात टेकोळे (मश्रुम) सुद्धा चवीने खाल्ल्या जाते.
माठाची भाजी
थोडी चिकट असणारी ही भाजी, श्रावण महिन्यातील सणात नैवेद्य दाखविण्यासाठी केली जाते. काही लोक याच भाजीला माठला ही म्हणतात, पाथरी ही रानभाजी शेतात सहज कुठेही उपलब्ध होते. खाण्यासाठी थंड असते. पित्ताचा त्रास कमी होऊन आराम मिळतो. पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. आरोग्यासाठी फायदेशीर भाजी आहे.
विविध प्रकारचे जीवनसत्वे
रानभाज्यामधे विविध प्रकारचे जीवनसत्वे असतात. निसर्गातून विविध ऋतूत मिळणारे फळे, भाज्या आरोग्यासाठी फायद्याच्या असतात. मात्र ह्या भाज्या खाताना त्याची गुणवत्ता तपासून त्या स्वच्छ धुवून खाव्यात. - डॉ.एन.पी. नांदे, वैद्यकीय अधीक्षक्त ग्रामीण रुग्णालय