जालना / मंठा : राज्य शासनाने जून- २०२३ मध्ये सर्वसमावेशक पीकविमा योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामातही केवळ एक रुपया भरून पीकविमा योजनेत सहभागी होता येणार आहे. १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत गहू, कांदा व हरभरा यासाठी पीकविमा भरता येणार आहे.
राज्य शासनाने यावर्षीपासून शेतकऱ्यांना प्रति एक रुपया याप्रमाणे पीकविमा योजनेस सुरुवात केली आहे. नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पीकविमा योजनेंतर्गत मदत मिळू शकेल.
अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी पीकविमा काढून घेणे फायद्याचे ठरणार आहे. शेतकऱ्यांनी वेळेवर पीकविमा अर्ज व्यवस्थित भरावा, यामुळे अडचण येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
पीकविमा भरण्याचे आवाहन
• पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांना मोठा फटका बसला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त आता रब्बी पिकांवर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रबी हंगामातील पिकांची नुकसान भरपाई करून घेण्यासाठी पीकविमा भरणे आवश्यक आहे.
• शेतकऱ्यांना १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत ज्वारी, गहू, कांदा, हरभरा इत्यादी पिकांचा पीकविमा भरता येणार आहे. त्यासाठी कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी नायगाव ग्रामपंचायत कर्मचारी लखन राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मंठा तालुक्यातील नायगाव येथील माजी सरपंच अविनाश राठोड यांनी केले आहे.
७० टक्के जोखीमस्तर निश्चित
खरीप हंगामात शेतकऱ्यांनी एका पिकासाठी एक रुपया देऊन विमा भरला होता. शेतकऱ्यांचा प्रीमियम केंद्र व राज्य शासनाने पीकविमा कंपनीला दिला आहे. त्यामुळे अग्रिमची रक्कम शेतकऱ्यांना मिळत आहे. सर्व अधिसूचित पिकांसाठी ७० टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आलेला आहे. त्यानुसार रब्बीत देखील शेतकऱ्यांना विमा रक्कम दिली जाणार आहे. पीकविमा योजना अधिसूचित पिकांसाठी लागू राहणार आहे. रब्बी गहू बागायती, ज्वारी बागायती, हरभरा, कांदा ही पिके अधिसूचित करण्यात आली आहेत.
सीएससीवर अर्ज भरता येईल
रब्बी हंगामातील पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. https://pmfby.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन शेतकरी पीकविमा अर्ज भरू शकतात. बँका, विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्र यांच्यामार्फतही पीकविमा अर्ज दाखल केला जाऊ शकतो.