Join us

Rabbi seeds : बियाणांच्या मागणीला तांत्रिक अडचणींचा खोडा; ऑनलाईन अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2024 3:10 PM

रब्बीची पेरणी जवळ येऊन ठेपली आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना बियाणांसाठी महाडीबीटीवर अर्ज करावे लागणार आहेत. (Rabbi seeds)

Rabbi seeds :

ताडकळस : रब्बीची पेरणी जवळ येऊन ठेपली आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना बियाणांसाठी  महाडीबीटीवर अर्ज करावे लागणार आहेत. मात्र, सद्यःस्थितीत अर्ज सादर करण्यात अर्ज तांत्रिक अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांमधूनच चिंता व्यक्त होत आहे.

लवकरात लवकर वेबसाइटची तांत्रिक अडचण दूर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. शासनाकडून रब्बी पिकाच्या पेरणीसाठी प्रमाणित बियाणासाठी ५० टक्के अनुदान, तसेच पीक प्रात्यक्षिकाकरिता शंभर टक्के अनुदानावर बियाणे देण्यात येतात.

त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करणे आवश्यक आहे; परंतु मागील काही दिवसांपासून दिलेल्या संकेतस्थळावर वेगवेगळ्या तांत्रिक अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे.

पावसाने उघडीप दिल्याने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणी सुरू केली. त्यात हे अर्ज भरण्यासाठी अडचणी येत असल्याने सोयाबीन कापणी, काढणीचे काम सोडून ई-सेवा केंद्रावर ताटकळत बसावे लागत आहे.

खरीप हंगाम संपल्यात जमा असून, शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे; परंतु अद्याप हरभरा बियाणासाठी अर्ज सादर झाला नसल्याने अर्ज सादर कधी होणार,  त्याची सोडत होऊन कधी बियाणे मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

अर्ज दाखल करण्यासाठी रविवारचा दिवस शेवटचा

संकेतस्थळ व्यवस्थित सुरू नसल्याने सध्या नवीन अर्ज सादर होत नाहीत. याबाबत कृषी विभागाशी संपर्क केला असता त्यांनी सध्या नवीन अर्ज सादर होत नसल्याने हीच परिस्थिती राहिली, तर अर्ज सादर करण्याच्या मुदतीमध्ये वाढ होऊ शकते, असे सांगण्यात आले.

रब्बीचा हंगाम तोंडावर असून हा खोळंबा सुरू झाला आहे. लवकर बियाणे नाही भेटल्यास रब्बीचे नियोजन बिघडण्याचे चित्र दिसत आहे. तसेच बियाणे बाजारातून घ्यायचे म्हणल्यास आर्थिक नियोजनही बिघडते काय की असे वाटत आहे. - सदाशिव भोसले, शेतकरी

शासनाने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागतात. परंतु, कधी संकेतस्थळाचा व वीजेची समस्या येत असल्याने काम होत नाही.- रामप्रसाद आंबोरे, शेतकरी

२ हेक्टरपर्यंत मर्यादा

महाडीबीटीवरून हरभरा, करडई, गहू, जवस, मोहरी पिकांसाठी कमाल मर्यादा ही २ हेक्टरपर्यंत असून, यामध्ये जुने, तसेच नवीन प्रमाणित केलेले बियाणे ५० ते १०० टक्के अनुदानामध्ये मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा याकडे कल वाढला आहे.

टॅग्स :कृषी योजनारब्बीसुर्यफुलपीकहरभरा