महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरीचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या संकल्पनेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. सि. एस. पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांच्या मार्गदर्शनेतून विद्यापिठ कार्यक्षेत्रात कृषि पारायण व मॉडेल व्हिलेज उपक्रम राबविला जात आहे. त्या अनुषंगाने जिल्हा विस्तार केंद्र, नाशिक, कृषि संशोधन केंद्र, निफाड यांचे मार्फत निवड केलेल्या पिंपळगाव निपाणी ता. निफाड या गावात रब्बी-पिक शेतकरी प्रशिक्षणाचा कार्यक्रम दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि संशोधन केंद्र, निफाड येथील गहू विशेषज्ञ डॉ. सुरेश दोडके होते. तसेच जिल्हा विस्तार केंद्राचे प्रमुख डॉ. योगेश पाटील, कवकशास्त्रज्ञ, डॉ. बबनराव इल्हे, प्रा. संजय चितोडकर, कृषि संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत येथील शास्त्रज्ञ डॉ. राकेश सोनवणे प्रमुख उपस्थितीमध्ये पिंपळगाव निपाणी गावातील जेष्ठ नागरिक श्री. सुदाम बोडके, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर खाडे, देविदास खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ. योगेश पाटील यांनी शेतकरी-शास्रज्ञ सुसंवादाचे महत्व अधोरेखित करून जिल्हा विस्तार केंद्र, कृषि संशोधन केंद्र, निफाड मार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाविषयी माहिती देऊन, जास्तीत जास्त शेतकरी व ग्रामीण युवकांनी सहभाग नोंदवण्याविषयी सांगितले. तांत्रिक मार्गदर्शनात डॉ. राकेश सोनवणे यांनी रब्बी कांदा लागवडीचे तंत्रज्ञान या विषयी माहिती सांगून शेतकऱ्यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या कांद्याचे विविध वाण वापराचे आवाहन केले.
प्रा. संजय चितोडकर यांनी गहू आणि हरभरा लागवड तंत्रज्ञान, डॉ. बबनराव इल्हे यांनी गहू आणि हरभरा एकात्मिक रोग व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले, अध्यक्षीय भाषणात डॉ. सुरेश दोडके यांनी या वर्षी रब्बी हंगामात पाण्याचा कार्यक्षम आणि काटकसरीने वापर करून विद्यापीठाने विकसित केलेल्या रब्बी ज्वारी, गहू, करडई आणि हरभरा या पिकांच्या कोरडवाहू तसेच कमी पाण्यात येणारे वाण शेतकऱ्यांनी वापरावे असे आवाहन केले तसेच कमी पाण्यात येणारे नेत्रावती व फुले अनुपम या गहू पिकाच्या वाणांची शेतकऱ्यांनी पेरणी करावी असे सांगितले तसेच उत्पादन खर्च कमी करण्यास व पर्यावरण पूरक शेती करण्याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रम आयोजनासाठी कृषि संशोधन केंद्र, निफाडचे प्रमुख डॉ. सुरेश दोडके यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. योगेश पाटील यांनी तर आभार श्री. ज्ञानेश्वर खाडे यांनी मानले. या रब्बी पिक शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पिंपळगाव निपाणी गावाचे ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी, नागरिक, शेतकरी आणि कृषि संशोधन केंद्र, निफाडचे अधिकारी कर्मचारी श्री. संजय वाघ, श्री. अनिल पाटील यांचे सहकार्य लाभले.