Rabi Crop :
राजरत्न सिरसाट / अकोला :
जिल्ह्यातील दोन मोठ्या व तीन मध्यम प्रकल्पांत यावर्षी १०० टक्के जलसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना रब्बी व उन्हाळी पिकांच्या सिंचनासाठी मुबलक जलसाठा मिळणार आहे.
पाणी देण्याची तयारीही जलसंपदा विभागाने सुरू केली आहे.
जिल्ह्यात काटेपूर्णा व वाण दोन मोठे सिंचन प्रकल्प असून, काटेपूर्णा प्रकल्पात ९९.४८ टक्के तर वाण प्रकल्पात ९३.७० टक्के जलसाठा यावर्षी उपलब्ध आहे. काटेपूर्णा सिंचन प्रकल्पातंर्गत ८ हजार ३२५ हेक्टर सिंचन क्षमता असून, वाण प्रकल्पांतर्गत १८ हजार ९२४ हेक्टर सिंचन क्षमता आहे.
मागील वर्षी काटेपूर्णा प्रकल्पात ८२ टक्केच जलसाठा संचयित झाला होता. यामुळे ६ हजार ५०० हेक्टरच्या जवळपास क्षेत्राला सिंचनासाठी या प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले होते.
यावर्षी उपलब्ध साठा बघता पूर्ण क्षमतेने सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे.
पातूर तालुक्यातील मोर्णा प्रकल्पांतर्गत २८०० हेक्टरवर सिंचन क्षमता असून, निगृणा प्रकल्पातंर्गत २७०० हेक्टर, विश्वमित्रा प्रकल्पातून १२०० तर दगडपारवा प्रकल्पांतर्गत ६५० हेक्टर सिंचन क्षमता आहे.
जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पांचा एकूण जलसाठा हा ८४.६४ टक्के एवढा आहे. यात घुंगशी प्रकल्प सोडला तर सर्वच मध्यम प्रकल्पात १०० टक्के जलसाठा उपलब्ध आहे, ही यावर्षी शेतकऱ्यांसाठी जमेची बाजू आहे.
पाण्याचे आरक्षण ठरणार
यावर्षी प्रकल्पातील पाण्याचे आरक्षण १५ ऑक्टोबरपर्यंत निश्चित केले जाणार आहे. याकरिता शेतकऱ्यांची मागणी किती हे देखील ठरविले जाणार आहे. त्यानंतर सहकारी पाणीवापर संस्थासोबत पाणी वाटपासंदर्भात चर्चा केली जाणार आहे.
कालवा सल्लागार समितीची लवकर बैठक
प्रकल्पातील सिंचनासाठी सोडण्याबाबत कालवा सल्लागार समितीची लवकरच बैठक होणार असून, या बैठकीत कालव्यामार्गे सोडण्यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे.
यावर्षी शेतकऱ्यांची मागणी बघून प्रथम रब्बी हंगामासाठी सिंचन प्रकल्पातील पाण्याचे नियोजन केले जाणार आहे. उन्हाळी पिकांसाठी शेतकऱ्यांकडून मागणी आल्यास तसे नियोजन करण्यात येईल. - अमोल वसूलकर, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग