Rabi Crop: राज्यातील खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात असून आता रब्बी पेरण्यांना वेग आला आहे. अनेक ठिकाणी रब्बी पेरण्या मागील पंधरा दिवसांत पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे ज्वारीचे पीक उगवून आले आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, करडई हे पीके मोठ्या प्रमाणावर घेतले जातात. तर रब्बीच्या पिकांसाठीचे हमीभाव केंद्र सरकारने जाहीर केलेले आहेत.
केंद्र सरकारने गहू, हरभरा, करडई, मोहरी आणि मसूर या पिकांसाठी २०२५-२६ या विक्री वर्षामध्ये मिळणाऱ्या म्हणजे आत्ता लागवड केलेल्या पिकांची काढणी झाल्यानंतर मिळणारा दर जाहीर केला आहे. मागील हंगामातील एमएसपी मध्ये आणि पुढील हंगामातील एमएसपीमध्ये १०० ते ३०० रूपये प्रतिक्विंटलचा फरक आहे.
दरम्यान, यामध्ये गव्हासाठी मागच्या हंगामात २ हजार २७५ रूपये हमीभाव होता तर यावर्षी २ हजार ४२५ रूपये हमीभाव मिळणार आहे. हरभऱ्यासाठी ५ हजार ४४० रूपये हमीभाव होता तर चालू हंगामातील हरभऱ्यासाठी ५ हजार ६५० रूपये दर मिळणार आहे. करडईसाठी मागच्या हंगामात ५ हजार ८०० रूपये दर होता तर चालू हंगामातील ५ हजार ९४० रूपये दर मिळणार आहे.
त्याबरोबरच मोहरी या पिकासाठी मागच्या हंगामात ५ हजार ६५० रूपये प्रतिक्विंटल दर होता. तर या हंगामात ५ हजार ९५० रूपये दर मिळणार आहे. मसूर या पिकासाठी मागच्या हंगामात ६ हजार ४२५ रूपये प्रतिक्विंटल हमीभाव होता तर या हंगामात ६ हजार ७०० रूपये प्रतिक्विंटल हमीभाव मिळणार आहे. या पाचही पिकांचा विचार केला तर मागच्या हंगामातील हमीभावाच्या तुलनेत यंदा १०० ते ३०० रूपयापर्यंत दर वाढले आहेत.