Pune : यंदाच्या म्हणजेच २०२४-२५ च्या रब्बी हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात असून कृषी आयुक्तालयाच्या माहितीनुसार आत्तापर्यंत ६५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये हरभरा, ज्वारी, गहू, राजमा, मका या पिकांचा प्रामुख्याने सामावेश आहे. आत्तापर्यंत ३५ लाख हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या असून या पिकांचा विमा भरण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ घेता यावा यासाठी सरकारने १ रूपयांत पीक विमा योजना सुरू केली असून यंदाच्या रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना एक रूपयांत फळपीक विम्याचा लाभ घेता येणार आहे. आत्तापर्यंत १८ लाख ७९ हजार ८२२ शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पीक विम्यासाठी अर्ज केला आहे.
मागच्या हंगामातील म्हणजेच रब्बी २०२३-२४ हंगामात ७१ लाख ८७ हजार शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केला होता. तर या तुलनेत यंदा आत्तापर्यंत केवळ २६ टक्के शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.
अंतिम मुदत
रब्बी ज्वारी पिकासाठी विमा अर्ज करण्याची अंतिम मुदत - ३० नोव्हेंबर २०२४
गहू, हरभरा व कांदा पिकासाठी विमा अर्ज करण्याची अंतिम मुदत - १५ डिसेंबर २०२४
शेतकऱ्यांनो, हे लक्षात ठेवा
१. दुसऱ्याच्या शेतावर,
२. शासकीय जमिनीवर
३. मंदिर , मज्जिद, ट्रस्ट, औद्योगिक वापर क्षेत्रावर सारख्या जमिनीवर
३. अकृषक जमिनीवर
४. पीक पेरणी केली नसताना
५. पेरणी क्षेत्र पेक्षा जास्त क्षेत्रावर विमा घेऊ नये
६. बोगस ७/१२ उतारा जोडून विमा योजनेत भाग घेऊ नये .
विमा योजनेत भाग घेण्यासाठी www.pmfby.gov.in या संकेत स्थळावर नोंदणी करावी किंवा संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे अधिक माहिती साठी संपर्क साधावा.