बीड : रब्बीच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्यास अद्यापही प्रतिसाद दिलेला नाही. खरीप २०२४ हंगामातील अग्रीम पीकविमा रखडल्याने यावर्षी शेतकऱ्यांमध्ये पीकविमा बाबत अनुत्साह आहे. तर रब्बी हंगामातील पीक विमा भरण्याची अंतिम तारीख जवळ आली असून शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
यावर्षी हरभरा, रब्बी ज्वारी (बागायती व जिरायती) व गहू इत्यादी पिकांचा पीकविमा भरता येत असून पीकविमा भरण्याची अंतिम तारीख ही रब्बी ज्वारी (बागायती व जिरायती) साठी ३० नोव्हेंबर आणि गहू, हरभरा, कांदा या पिकांसाठी १५ डिसेंबर अशी आहे. बीड जिल्ह्यातील केवळ दीड लाख शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत पीकविमा भरला आहे.
बीड तालुक्यात रब्बी कांदा पीकविमा भरता येत नाही तर माजलगाव, परळी, पाटोदा, अंबाजोगाई या तालुक्यात कांदा पीकविमा भरता येतो. आतापर्यंत जिल्ह्यात १ लक्ष ५८ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा भरला असून ८० हजार ६७५ हेक्टर क्षेत्र संरक्षित क्षेत्र रब्बी पीकविमा अंतर्गत नोंदणीकृत झालेले आहे. खरीप प्रमाणेच बीड, गेवराई, माजलगाव या तालुक्यांमध्ये रब्बी पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.
गतवर्षी नुकसानीची तक्रार देणाऱ्या शेतकऱ्यांना रब्बी पीकविमा मिळालेला होता. मात्र बहुतांश शेतकऱ्यांनी तक्रारी न केल्याने ते या योजनेस पात्र ठरू शकले नव्हते. यावर्षी शेतकऱ्यांनी प्राधान्याने रब्बी पीकविमा भरून घ्यावा व नुकसान झाल्यानंतर त्याची तक्रार देखील करावी असे आवाहन बीड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक धनंजय गुंदेकर यांनी केले आहे.
पीक नुकसान तक्रार केली तरच मिळणार भरपाई
विमा योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अर्जदार शेतकऱ्याने स्थानिक नैसर्गिक आपत्ती गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी, विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग व काढणी पश्चात नुकसान भरपाई (गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस व बिगर मोसमी पाऊस) या बाबी अंतर्गत सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसुचित पिकाच्या काढणी नंतर १४ दिवसा पर्यंत झालेल्या नुकसानीची पुर्व सुचना नुकसानीच्या ७२ तासाच्या आत क्रॉप इन्शुरन्स ॲप/कृषि रक्षक संकेतस्थळ सहायता क्रमांकावर द्यावी.
सदरची जोखीम केवळ अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांनाच लागू होईल. योजने अंतर्गत अधिसुचित क्षेत्रात पिक कापणी प्रयोगांद्वारे निश्चित होणारे पिकांचे सरासरी उत्पन्नाची उंबरठा उत्पन्नाशी तुलना करुन येणाऱ्या घटीनुसार व योजनेच्या मार्गदर्शक सुचनेच्या अधीन राहून अधिसुचित क्षेत्रात नुकसान भरपाई निश्चित केली जाते.