Rabi Crop Loan :दिनेश पठाडे / बुलढाणा : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात ५९ हजार २०० शेतकऱ्यांना ७०० कोटी रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. बँकनिहाय कर्ज वाटपाचा लक्ष्यांक देण्यात आला असून १ ऑक्टोबरपासून कर्जवाटपाला प्रारंभ झालेला आहे.खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनची सोंगणी, मळणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची उपलब्धता आहे. त्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. अतिवृष्टी आणि रोगराई यामुळे सोयाबीन उत्पादनात बरीच घट झालेली आहे.
तर दुसरीकडे बाजारात सोयाबीन मालाला अपेक्षित भावही मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. काही शेतकरी सोयाबीन भाव वाढतील या अपेक्षेने सोयाबीन राखून ठेवत बँकेकडून पीककर्ज घेण्याचा पर्याय स्वीकारतात.
खरिपात केवळ ४४ टक्के शेतकऱ्यांना कर्जवाटपखरीप हंगाम २०२४ मध्ये बँकांकडून अपेक्षित कर्जवाटप झाले नसल्याची वस्तुस्थिती असून ३० सप्टेंबरच्या अंतिम अहवालानुसार जिल्ह्यात उद्दिष्टाच्या केवळ ४४ टक्के शेतकऱ्यांना खरिपात कर्ज मिळाले आहे. विविध बँकांनी मिळून ६८ हजार ७९ शेतकऱ्यांना ७७६ कोटी ९५ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. रकमेच्या तुलनेत ५२ टक्के कर्जवाटप झाले.
गव्हसाठी ५५ हजार ६६५ रु. मर्यादा
रब्बी हंगामात गहू पिकासाठी हेक्टरी ३७ हजार ५०८ ते ५५ हजार ६६५ रुपये कर्ज घेता येईल तर ओलिताखालील जमिनीत हरभरा पेरणी करावयाची असल्यास प्रति हेक्टर ३६ हजार ५०८ते ५५ हजार ५९४ रुपये कर्ज मिळू शकेल. रब्बी हंगामात पेरणीसाठी कर्ज घ्यावयाचे असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित बँकेत संपर्क साधून कर्ज मागणी प्रस्ताव देत कर्जाची उचल करावी.
रब्बी हंगाम २०२४ मध्ये बुलढाणा जिल्ह्याकरिता ७०० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्या-त्या बँकेला कर्ज वाटपाचा लक्षांक निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार १ ऑक्टोबरपासून कर्जवाटपास प्रारंभ झालेला आहे. -कौशलेंद्र कुमार सिंह, अग्रणी बँक व्यवस्थापक
काय सांगते आकडेवारी
गतवर्षीची वाटप स्थिती
६३५०० | |
रक्कम | ६५० कोटी |
कर्ज मिळालेले शेतकरी | २६,३७८ |
कर्जवाटप रक्कम | ३०८.५९ कोटी |
यंदाचे उद्दिष्ट
शेतकरी | ५९२०० |
रक्कम | ७०० कोटी |
कोणत्या पिकासाठी घेता येईल पीक कर्ज?
रब्बी ज्वार(ओलित), रब्बी ज्वार(कोरडवाहू), गहू, हरभरा (ओलित), हरभरा (कोरडवाहू), सूर्यफुल आदी पिकांना कर्ज घेता येईल.