Join us

Rabi Crop Management : खरीप हंगामातील तोटा 'रब्बी'त भरून निघेल काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2024 11:11 AM

खरीप हंगामात झालेला तोटा रब्बी हंगामात तरी भरून निघेल, या आशेने शेतकरी रब्बी हंगामातील पेरणीसाठी मशागतीला लागला आहे; मात्र गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान लक्षात घेता, यंदा पीक साथ देइल का, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

दामोदर कपले

अडगाव खुर्द : खरीप हंगामात झालेला तोटा रब्बी हंगामात तरी भरून निघेल, या आशेने शेतकरीरब्बी हंगामातील पेरणीसाठी मशागतीला लागला आहे; मात्र गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान लक्षात घेता, यंदा पीक साथ देइल का, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

यावर्षी खरीप हंगामात सततच्या पावसामुळे कपाशी, सोयाबीन, तूर पिके पाहिजे तशी बहरली नाही, त्यातच सोयाबीनची कापणी व मळणी करण्यात आली; मात्र ऐन कापणी व मळणीच्यावेळी परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची दाणादाण उडाली होती. पिकाला लावलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आता शेतशिवार रिकामे झाले आहे.

सोयाबीनचे उत्पन्न जेमतेमच झाल्यामुळे आता रब्बी हंगामातील पिकावरच शेतकऱ्यांची भिस्त आहे. पुन्हा एकदा नव्या जोमाने शेतकरी व्याजाने, उसनवारी पैसे घेऊन रब्बी हंगामातील गहू, हरभरा पेरणीसाठी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची मशागत करून पेरणीचे पूर्वनियोजन करतानाचे चित्र दिसून येत आहे; मात्र खरिपाच्या उत्पन्नात झालेला तोटा रब्बीच्या हंगामात भरून निघेल की नाही, याची तिळमात्र शाश्वती नाही.

यावर्षी झालेल्या सततच्या पावसाने सोयाबीन पीक पाहिजे तसे बहरले नाही, त्यातच सोयाबीनचे उत्पादन एकरी दोन-तीन क्चिटलपर्यंतच झाले. त्यामुळे उत्पन्नात तोटा सहन करावा लागला. हा तोटा रब्बी हंगामात भरून निघेल, या आशेने रब्बी हंगामातील पेरणीपूर्वी मशागत सुरू केली आहे. - श्रीराम सुभेदार, शेतकरी, अडगाव खुर्द जि. अकोला.

सततच्या पावसामुळे सोयाबीनचा एकरी उतारा दोन-तीन क्विंटलपर्यंतच झाला आहे. पिकांना लावलेला खर्चही त्यातून निघत नसल्याने नफा होण्याऐवजी तोटाच सहन करावा लागला, रब्बी हंगामातील पिकातून तरी चांगले उत्पन्न होईल, या आशेने शेतकरी मशागतीला लागला आहे. - नितीन गावंडे, शेतकरी, अडगाव खुर्द जि. अकोला.

दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांना फटका बसतो. कसेबसे पीक वाचले, तर बाजारपेठेत कवडीमोल भावाने माल खरेदी केला जातो. यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. - रोशन रंदे, शेतकरी, अडगाव खुर्द जि. अकोला.

काढणी व मळणी खर्चही निघाला नाही!

• अडगाव खुर्द, दाऊतपूर, ग्याजुद्दीनगर, कातखेड, मलकापूर, नेव्होरी बु., नेव्होरी खुर्द येथील शेतकऱ्यांनी खरिपात बँकेचे, खासगी कर्ज काढून, तर काहींनी उसनवारी करून कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिकांची पेरणी केली होती.

• सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते; मात्र त्यानंतर समाधानकारक पाऊस पडल्याने पिके चांगली बहरली होती.

• ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या सततच्या पावसाने कपाशी, सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. परिणामी, सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट येऊन आर्थिक फटका बसला. काही शेतकऱ्यांचा, तर काढणी व मळणीचा खर्च सुद्धा निघाला नाही.

हेही वाचा : Soybean Market : आवक कमी त्यात दराचीही नाही हमी; सोयाबीन उत्पादकांचे यंदा हाल बेहाल

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपाऊसखरीपरब्बीपीक व्यवस्थापनबाजार