Rabi Crop Season :
वाशिम :
खरीप हंगाम संपत आला असून, कृषी विभागाने रब्बीच्या पेरणीचे नियोजन पूर्ण केले. जिल्ह्यात १ लाख २७ हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित असून, त्यामध्ये हरभरा व गव्हाचे क्षेत्र सर्वाधिक राहण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला.
यंदा खरीप हंगामात बऱ्यापैकी पाऊस झाला. सप्टेंबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात संततधार पाऊस झाल्याने विहिरी, शेततळे, प्रकल्प तुडुंब झाले. सध्या सोयाबीन सोंगणी व काढणीच्या कामांना शेतकऱ्यांनी चांगलीच गती दिल्याचे दिसून येते.
रब्बी हंगामातील पेरणीसाठी शेतीच्या मशागतीची कामेही सुरू होतील. यंदा जिल्ह्यातील प्रकल्प, विहिरींमध्ये मुबलक जलसाठा असल्याने रब्बी हंगामात पेरणीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला. दरवर्षी रब्बी हंगामात गहू व हरभऱ्याचे क्षेत्र सर्वाधिक असते. यंदाही गहू व हरभऱ्याची सर्वाधिक पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्याच बरोबर चिया, करडी पिकांनाही शेतकऱ्यांची पसंती मिळणार आहे.
रब्बीचे क्षेत्र वाढणार?
जिल्ह्यात सरासरी ८२ हजार २४६ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी होते. मागील दोन वर्षात मात्र मुबलक जलसाठ्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसते. यंदा तर प्रकल्प तुडुंब असल्याने कृषी विभागाने १ लाख २७ हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज वर्तविला आहे.
करडई, चियाचे क्षेत्र दुपटीने वाढणार!
• जिल्ह्यात मागील काही वर्षात करडईचे क्षेत्र कमालीचे घटले. आता पुन्हा करडईचे क्षेत्र वाढविण्याचे प्रयत्न कृषी विभागाकडून सुरू आहेत.
• यंदाच्या रब्बी हंगामात १५०० हेक्टरवर करडई पेरणीचे नियोजन आहे.
• चिया या पिकाखालील क्षेत्रातदेखील वाढ करण्यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे.
• मागील वर्षी दीड हजार हेक्टरवर चिया पेरणी झाली होती. यंदाच्या रब्बी हंगामात ३ हजार हेक्टरवर चिया पेरणीचे नियोजन आहे.
रबी पीक प्रस्तावित क्षेत्र (हेक्टर)
हरभरा | ८३००० |
गहू | ३८५०० |
चिया | २००० |
करडी | १५०० |
मोहरी | ३०० |
रब्बी ज्वारी | २०० |
मका | २०० |
रब्बी पीक प्रस्तावित एकूण क्षेत्र (हेक्टर) १,२७,५०० एकूण
रब्बी हंगामात पीक पेरणीचे नियोजन पूर्ण झाले आहे. सर्वाधिक पेरणी हरभरा व त्याखालोखाल गहू पिकाची होईल. करडई व चिया पिकाखालील क्षेत्रातही वाढ करण्याचे प्रयत्न आहेत.
- गणेश गिरी, कृषी विकास अधिकारी, वाशिम