Rabi perani :
वाशिम : आता शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामाची तयारी सुरू आहे. पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली असतानाच सोयाबीनला बाजारभावही कमी मिळत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
आता शेतकऱ्यांची दारोमदार रब्बी हंगामावर अवलंबून आहे. यावर्षीच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांची गव्हाऐवजी हरभरा पिकाला पसंती राहण्याचा अंदाज असून, कृषी विभागाकडून ८२ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.
यावर्षी खरीप हंगामात पिके बहरावर आली असतानाच पावसाने खोडा घातला. त्यामुळे अनेक ठिकाणी सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाले. काही भागातील सोयाबीनच्या पिकांना फुलधारणा आणि शेंगांचे प्रमाण कमी असल्यामुळे उत्पन्नावर परिणाम झाला. खरीप हंगाम आटोपत आला असून, सर्वत्र रब्बीची लगबग वाढली आहे.
कृषी विभागाकडील नियोजनानुसार जिल्ह्यातील १ लाख २६ हजार ५० हेक्टर क्षेत्रापैकी सर्वाधिक ८२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर हरभरा क्षेत्र प्रस्तावित आहे. यापाठोपाठ गव्हाचे क्षेत्र ३८ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर आहे. यावर्षी पावसाळा लागूनही पावसाचे प्रमाण अत्यल्प होते.
मात्र, जुलै, सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस झाल्यामुळे जेमतेम पाणीसाठा असलेल्या प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. रब्बीचा हंगाम लागण्यापूर्वीच जिल्ह्यातील प्रकल्प तुडुंब भरले. यामुळे रब्बीच्या हंगामाची चिंता मिटली होती. पाऊस मुबलक असला तरी गव्हाच्या तुलनेत आता शेतकऱ्यांचा कल हरभरा पिकांकडे वाढला असल्याचे दिसून येते.
हरभरा पिकाला कमी पाणी लागते. त्यातुलनेत गव्हाच्या पिकाला भरपूर पाणी लागते. यामुळे अल्पभूधारक वा खडकाळ जमीन असलेले शेतकरीही हरभरा पिकांकडे वळत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांनी हरभरा पिकांच्या पेरणीला सुरुवात केली आहे.
प्रकल्प तुडुंब, सिंचनाची सुविधा
जिल्ह्यातील तीन माध्यम प्रकल्प व इतर लघु प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे. यामुळे प्रकल्पाजवळील शेतकऱ्यांना रब्बीच्या हंगामात मदत होईल, अशी शक्यता आहे.
मोहरी, मक्याचे क्षेत्र कमीच
• पुर्वी शेतकरी मका, मोहरी पिकांची मोठ्या प्रमाणावर रब्बीत पेरणी करायचे.
• परंतु वातावरणातील बदल आणि मिळणारे भाव लक्षात घेता शेतकऱ्यांनी मोहरी, मका पेरणीकडे दुर्लक्ष केले असून या रब्बीच्या हंगामात मोहरी ३०० व मका केवळ २०० हेक्टर क्षेत्रफळावरच पेरणीचे नियोजन आहे.
कोणत्या पिकाचे किती क्षेत्रावर नियोजन?
हरभरा | ८२५०० |
गहु | ३८५०० |
ज्वारी | २००० |
चिया | १००० |
सु. करडई | १००० |
मोहरी | ३०० |
मका | २०० |