Rabi Perani :
लातूर : यंदा जून महिन्यापासून पाऊस सुरू आहे. ऑक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस थांबता थांबत नाही. दररोज कोठे ना कोठे पाऊस बरसत आहे. परिणामी, सोयाबीनच्या राशीला अडथळा निर्माण होत असून रब्बीच्या पेरणीसाठी शेतीची मशागतही करता येत नाही.
त्यामुळे चांगला पाऊसकाळ होऊनही शेतकरी अडचणीत आहेत. शेतात डोळ्यांदेखत सोयाबीन पावसाने कुजत आहे, तर रब्बीसाठी शेती तयार करता येत नाही, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत.
लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ८६७.४ मिमी पाऊस पडला आहे. वार्षिक सरासरी ७०६ मिमी पावसाच्या सरासरीपेक्षा १६७ मिमी अधिक पाऊस झाला आहे.
आजघडीला अनेक शेतशिवारामध्ये वाफसा नाही. त्यामुळे खरिपातील सोयाबीन पीक काढता येत नाही. ज्यांनी काढले आहे त्यांना रास करता येत नाही, अशी परिस्थिती पावसामुळे झाली आहे.
उडीद, मूग पावसामुळे गेले. सोयाबीन पिकावर मदार होती. परंतु तेही वाफसा नसल्यामुळे शेतातून काढता येत नाही. ज्यांनी काढले आहे, त्यांना पावसामुळे रास करण्यास अडचण येत आहे.
पाण्यामध्ये सोयाबीन शेतातच कुजत आहे. ज्या ठिकाणी पाऊस ओसरला आहे, त्या ठिकाणी सोयाबीन काढण्यासाठी मजूर मिळत नाहीत. मिळाले तर जेवढा खर्च पेरणीसाठी झाला, तेवढा निघेल का याचा भरवसा नाही. त्यात पाऊस सुरूच असल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे.
• पाच महिने होत आले तरी पाऊस थांबत नसल्याचे चित्र आहे. अनेक शेतकरी सोयाबीन काढणीनंतर रब्बी पेरणीच्या तयारीसाठी पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत.
• यावर्षी रब्बीच्या पेरण्या पावसामुळे लांबणार असल्याची चिन्हे सध्या तरी दिसत आहेत.
रब्बीच्या पेरण्या लांबणार....
शेतीच्या मशागतीला पाऊस वेळ देत नाही. त्यामुळे यंदा रब्बीच्या पेरण्या लांबण्याची शक्यता आहे. उडीद, मुगाच्या जागी रब्बी पेरा जिल्ह्यात होतो. तसेच सोयाबीन काढल्यानंतर हरभऱ्याची पेरणी त्या ठिकाणी होते. पण यंदा पाऊस थांबत नसल्यामुळे राशी थांबलेल्या आहेत. शिवाय, शेतीची मशागतही करता येत नाही. त्यामुळे रब्बीची पेरणी प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
रब्बीची तीन लाख ८२ हजार ५३७ हेक्टरवर पेरणी अपेक्षित
जिल्ह्यामध्ये तीन लाख ८२ हजार ५३७ हेक्टर रब्बीची पेरणी प्रस्तावित आहे. यापैकी ७१ हजार ४ हेक्टरवर ज्वारी तसेच २ हजार ६६३ हेक्टरवर मका, गहू १० हजार ५३२, हरभरा २ लाख ७६ हजार ९५२, जवस १८०, सूर्यफूल ८६ आणि करडई २१ हजार ७२० हेक्टरवर पेरणी होईल, असे प्रस्तावित आहे. सर्व क्षेत्रावर पेरणी करण्यासाठी सध्या पाऊस थांबणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय झालेला पाऊस....
लातूर | ८०९.६ |
औसा | ९२१.९ |
अहमदपूर | १०२२.० |
निलंगा | ८६६.६ |
उदगीर | ८३२.८ |
चाकूर | ९५९.५ |
देवणी | ९२९.२१ |
शिरूर अनंतपाळ | ७१६.२ |
जळकोट | ८५१.३ |
एकूण | ८६७.४ |