Rabi Season 2024 :
भोकरदन : तालुक्यात यंदा दमदार पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात हरभरा व मका पिकाची मोठ्या लागवड केली आहे. तालुक्यातील शेतकरी गेल्या चार-पाच वर्षांपासून विदर्भातील शेतकऱ्यांचा पॅटर्न राबवीत आहे.
खरीप हंगामात सोयाबीन आणि रब्बी हंगामात हरभरा लागवड करून कमी खर्चात शेती करण्याचा हा विदर्भाचा उपक्रम राबवीत आहेत. शिवाय या पिकासाठी कमी पाणी आणि इतर पिकांच्या तुलनेत अधिक उत्पन्न देणारे पीक म्हणून हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येत आहे.
यंदा रब्बी हंगामात हरभऱ्यासह मका पिकाच्या लागवडीत वाढ होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी कृषी विभागाकडून नियोजन सुरू आहे.
यंदा तालुक्यात ६५ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी होणार आहे. परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे तालुक्यातील सर्वच जलसाठ्यांत मोठी वाढ झाली आहे; परंतु दुसरीकडे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले.
त्यात काही भागांत लागवडीचा खर्चही पदरात पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी योग्य पद्धतीने रब्बी पेरणीचे नियोजन करून पेरणीला सुरुवात केली आहे. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांनी हरभरा व मका पिकांना अधिक पसंती दिल्याचे शेतकरी सांगत आहेत.
शेतकरी सध्या शेतशिवारांत रब्बी पेरणीसाठी लगबग करीत असून, यंत्राच्या साहाय्याने रब्बीची पेरणी पूर्ण करून घेत आहेत. शिवाय, सध्या कृषी सेवा केंद्रांतही विविध नामांकित कंपनीचे बियाणे दाखल झाले असून, शेतकरी या बियाणांची चाचपणी करण्यासाठी कृषी केंद्रामध्ये गर्दी करीत आहेत.
यंदा रब्बी पेरणीसाठी समाधानकारक वातावरण
१. यंदा तालुक्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी असून, रब्बी पेरणीसाठी पोषक वातावरण असल्याने शेतकरी उत्साही दिसत आहे.
२. खरिपातील मूग, उडीद, मका, सोयाबीन, मिरची आदी पिकांची काढणी केलेल्या शेतकऱ्यांनी हारभरा व मकाची लागवड केली आहे.
शेतकऱ्यांनी फरदडच्या नादात पडू नये
तालुक्यातील शेतकऱ्यांनी कपाशीच्या दोन ते तीन वेचणी केल्यानंतर फरदडच्या नादात न पडता तत्काळ त्या शेतात रब्बीची पेरणी करावी. रब्बीची पेरणी करताना काही अडचण आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा. कृषी विभागाकडून रब्बी पेरणीचे नियोजन सुरू असून, शेतकऱ्यांना मदत आणि मार्गदर्शन केले जात आहे. - रामेश्वर भुते, तालुका कृषी अधिकारी, भोकरदन
मागील वर्षी भीषण पाणीटंचाई
गेल्यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने तालुक्यातील बहुतांश भागात रब्बी हंगामातील पिके हातची गेली होती. शिवाय, भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना हिरवा मकाही पाण्याअभावी जानवरांना टाकावा लागला; परंतु यंदा चांगला पाऊस असल्याने शेतकरी समाधानी आहेत.